जूनमध्ये सुरू होणार 5G ट्रायल, स्पेक्ट्रमचा लिलावही लवकरच
येत्या दोन आठवड्यांत सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सनला यासाठी परवाना दिला जाऊ शकतो
नवी दिल्ली : लवकरच भारतात 5G ची सर्व्हिस ट्रायल सुरू होणार आहे. वृत्तसंस्था IANS नं दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम मिनिस्ट्रीच्या पॅनलनं ट्रायलला हिरवा कंदील दिलाय. याची ट्रायल पुढच्या महिन्यात अर्थात जूनमध्ये सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिने याची पडताळणी होईल. येत्या दोन आठवड्यांत सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सनला यासाठी परवाना दिला जाऊ शकतो.
सॅमसंग आणि रिलायन्स जिओ, एअरटेल आणि नोकिया तसंच एरिक्सन व्होडाफोन - आयडियासोबत मिळून ट्रायल करणार आहे. यासाठी अगोदर 5G स्पेक्ट्रमचं वाटप केलं जाणार आहे. ट्रायलची सुरुवात दिल्लीच्या कनॉट प्लेसहून केली जाईल. टेलिकॉम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रायलसाठी वेळ वाढवून दिला जावा किंवा नाही, यावर वाटपानंतर विचार केला जाईल.
सध्या चायनीज कंपनी हुवेई (Huawei) ची स्थिती स्पष्ट नाही. अमेरिका वारंवार भारतासहीत इतर देशांना हुवेईला देशाबाहेरच ठेवण्यास सांगत आहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव शक्य होईल.