हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक (Digital Arrest) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास डि़जिटल अटकेच्या जाळ्यात अडकल्यानंतर अखेर थोडक्यात त्याची सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून सुटका झाली. सायबर आरोपींनी त्याला आपल्यासह व्हिडीओ कॉलवर ठेवलं होतं. शुक्रवारी रात्री हा सगळा प्रकार सुरु झाला. यादरम्यान पीडित इंजिनिअरने मियापूर ते अमीरपेठपर्यंत 15 किमी प्रवास केला. यावेळी त्याने एका लॉजमध्ये रुम बूक केली. रविवारी सकाळी जेव्हा इंजिनिअरचा कॉल अचानक बंद झाला तेव्हा त्याला संधी मिळाली आणि त्याने सायबर पोलिसांशी मदतीसाठी संपर्क साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी इंजिनिअरला मोबाईलवर संशयित मेसेज आले होते. ते स्पॅम असल्याचं लक्षात आल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शनिवारी रात्री 3 वाजता हा सगळा प्रकार सुरु झाला जेव्हा आरोपींनी त्याला फोन केला. सुरुवातीला त्यांनी आपण FedEx कुरिअर एजंट असल्याचा आणि नंतर मुंबई पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला. यादरम्यान त्याला तुझा आधार कार्ड क्रमांक मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणाशी जोडला असल्याची खोटी बतावणी करण्यात आली. 


पीडितला हे सर्व खरं असल्याचं वाटलं. पीडित जाळ्यात अडकल्याचं लक्षात येताच गुन्हेहारांनी त्याला व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडलं आणि जोपर्यंत अकाऊंटची छाननी होत नाही तोपर्यंत कट करु नको असं सांगितलं. 


सायबर क्राईम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडित फार घाबरला होता. रात्री 4 वाजता त्याने घऱ सोडलं. घऱातून जाताना त्याने पत्नी आणि लहान मुलाला आपल्या बॉससह हॉटेलमध्ये तातडीची बैठक असून पुढील काही तास व्यग्र असेन असं सांगितलं होतं. मी घऱी येत नाही तोपर्यंत मला फोन करु नका असंही त्याने सांगितलं होतं".


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित गाडी चालवत लॉजमध्ये जात असतानाही फोन कॉलवर होता. जर आमच्या सूचनेचं पालन केलं नाही तर तुझ्यासह कुटुंबाला अटक आणि कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागेल अशी धमकी त्यांनी दिली होती. 


"सोमवारी सकाळी बँक सुरु होईपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील असं पीडितला सांगण्यात आलं होतं. यानंतर तो व्हेरिफिकेशन करण्यासाठी बँक खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून पेमेंट करु शकतो आणि सुटका केली जाईल असं ते म्हणाले होते," असंही पोलिसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी रकमेचा आकडा सांगितला नव्हता. रविवारी सकाळी 4 वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. एका क्षणी पीडितचा फोन क़ॉल अचानक कट झाला आणि यादरम्याने त्याने हैदराबाद सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी सायबर पोलिसांना त्याची फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं.