`आधार`साठी आलेल्या या लिंकवर क्लिक करणं पडू शकतं भारी
गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत...
मुंबई : जर तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... काही दिवसांपूर्वी सरकारनं दिलेल्या बातमीनुसार आत्तापर्यंत जवळपास ११७ करोड लोकांना 'आधार' मिळालंय. सरकारनं काही दिवसांपूर्वी ई-आधार आणि मोबाईल आधारलाही मान्यता दिलीय. यानुसार, तुम्ही यूआयडीएआय (UIDAI)च्या वेबसाईटवरून तुमच्या आधारची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत...
नव्या गाईडलाईन्स?
या ई-मेलमध्ये उल्लेख केल्यानुसार यूआयडीएआयकडून नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्यात. ज्यानुसार, आता तुम्हाला आधारची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ८ कॅरेक्टरचा पासवर्ड टाईप करावा लागेल. या पासवर्डचे सुरुवातीचे चार कॅरेक्टर कार्ड होल्डरच्या नावातील असतील आणि उरलेले चार जन्म तारीख... याशिवाय योग्य फॉरमॅट जाणून घेण्यासाठी एका ठराविक लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं.
...पण या लिंकवर क्लिक करू नका
परंतु, अशावेळी तुम्ही जागरूक असणं आवश्यक आहे. या प्रकारच्या कोणत्याही ई-मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका... तशा सूचनाच यूआयडीएआयकडून देण्यात आल्यात. असा कोणत्याही पद्धतीचा मेल आपण यूझर्सला पाठवत नसल्याचं यूआयडीएआयनं म्हटलंय. ई-मेल वाचण्यापूर्वी आणि त्यावर उल्लेख केलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी हा मेल कुठून आलाय त्याची खातरजमा करून घ्या.