PhonePe यूजर्स ला झटका! आता या अॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं
आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.
मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी किंवा ऑनलाईन काही ऑर्डर करण्यासाठी फोनपे अॅप वापरत असतील. परंतु तुम्हाला आता फोन पे वापरणं महाग पडणार आहे. फोनपे वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये अशी माहिती सोमर आली आहे की, आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.
PhonePe ने काही वापरकर्त्यांकडून मोबाईल रिचार्जसाठी 1 ते 2 रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे अतिरिक्त शुल्क कोणत्याही पेमेंट मोड (UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोनपे वॉलेट) च्या माध्यमातून रिचार्जवर लागू केले जात आहे.
कंपनी प्रयोग करत आहे
कंपनीच्या प्रवक्त्याने यासंदर्भात सांगितले की, "जे लोकं या प्रयोगाचा भाग आहेत त्यांच्यासाठी 50 ते 100 रुपयांच्या व्यवहारासाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आम्ही लावले आहे." मीडिया रिपोर्टनुसार, प्रवक्त्याने सांगितले की, हा एका छोट्या बेसवर एक प्रयोग केला गेला आहे. बहुतांश वापरकर्त्यांना कदाचित 1 रुपये शुल्क आकारले जात आहे आणि ते सक्रिय वापरकर्त्यांपैकी आहेत.
परंतु कंपनी प्रवक्त्याने हे कशासाठी आणि कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे हे काही स्पष्ट केलेलं नाही, ज्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत.
तुम्ही फोनपे वर सर्व विमा कंपन्यांची उत्पादने खरेदी करू शकाल
अलीकडेच, फोनपेने सांगितले की, त्याला जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी इरडाई (IRDAI) कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. कंपनीने म्हटले होते की, यासह ती आता आपल्या 300 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना विमा संबंधित सल्ला देऊ शकते. इरडाईने फोनपेला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता PhonePe भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.