भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा दबदबा
भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनच्या मोबाईल कंपन्यांचा दबदबा कायम असल्याचं पहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनच्या मोबाईल कंपन्यांचा दबदबा कायम असल्याचं पहायला मिळत आहे.
भारत आणि चीन या देशांमध्ये तणावाचं वातावरणं असलं तरी भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सच्या ब्रँड्समध्ये सर्वाधिक विकले जाणारे फोन्स हे चीनी बनावटीचेच आहेत.
आकर्षक फोन, किंमत यामुळे चीनी फोन कंपन्यांनी जगभरात स्मार्टफोन्सच्या बाजारात आपलं वर्चस्व तयार केलं आहे. तज्ञांच्या मते चीनी कंपन्यांचा हा दबदबा येत्या काळातही असाच पहायला मिळेल.
जुलै-सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतात एकूण ३.९ कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी)च्या आकड्यांनुसार, यापैकी जवळपास ७५ टक्के स्मार्टफोन्स हे पाच कंपन्यांचेच आहेत.
या पाच कंपन्यांपैकी सॅमसंग वगळता इतर चारही कंपन्या चीनमधील आहेत. ज्यामध्ये शाओमी, लेनोव्हो, वीवो आणि ओप्पो या स्मार्टफोन कंपन्यांचा समावेश आहे.
बाजारात विक्री झालेल्या एकूण स्मार्टफोन्सच्या भागीदारीमध्ये सॅमसंग (२३.५ टक्के) विक्री करत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लेनोव्हो (९ टक्के) विक्री, विवो (८.५) टक्के आणि ओप्पो (७.९) टक्के भागिदारी राहीली आहे.
तज्ञांच्या मते, चीनी कंपन्याचा भारतीय बाजारपेठेत किती दबदबा आहे याचा अंदाज रेडमी नोट फोनच्या विक्रीवरुन येतो. शाओमीने गेल्या तीन महिन्यात रेडमी नोट ४ चे तब्बल ४० लाख स्मार्टफोन्स विकले होते. त्यामुळे हा फोन देशातील सर्वाधिक विकला गेलेला फोन बनला.