बीजिंग : चीनच्या वृत्तसंस्थेने आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून चालणाऱ्या थ्रीडी ऍंकरला लॉन्च केलं आहे. ही थ्रीडी एँकर सामान्य माणसाप्रमाणेच शरिराची हालचाल करू शकते, तसंच बातमीप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकते. पत्रकाराचं रूप आणि चेहऱ्याच्या हावभावाचं क्लोनिंग करून चीनने जगातला पहिलाच थ्रीडी एँकर बनवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शिन्हुआ आणि चीनची टेक कंपनी सोगाऊ यांनी मिळून थ्रीडी एँकर बनवली आहे. या एँकरचं नाव शिन शिआओई ठेवण्यात आलं आहे. याआधी २०१८ साली शिन्हुआने पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटलिजन्स एँकरला जगासमोर आणलं होतं. त्यावेळी ४ टुडी एँकर बनवण्यात आले होते. 


चीनने लॉन्च केलेल्या या थ्रीडी एँकरचा एक व्हिडिओ वृत्तसंस्थेने ट्विटरवरून शेयर केला आहे. 



काय आहे थ्रीडी एँकरची खासियत?


ही थ्रीडी एँकर आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून काम करते. आभासी असली तरी ही एँकर खरीखुरी असल्यासारखीच वाटते. या एँकरला बघून तुम्हाला ती नकली असल्याचं वाटणारही नाही. बातम्या देत असताना ही एँकर डोळ्यांच्या पापण्या मिटते. बसू शकते, तसंच उभी देखील राहू शकते. बातमीनुसार ही एँकर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि बोलण्याचा लहेजाही बदलते. ही एँकर हेयरस्टाईल आणि कपडेदेखील बदलू शकते. 


भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या एँकर स्टुडियोच्याबाहेरही बातम्या देताना दिसू शकतील, असा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.