Passenger Exposes Fake Vendor Watch Video: लोकल ट्रेन असो किंवा एक्सप्रेस ट्रेन असो अनेकदा छोट्यामोठ्या गोष्टी विकणारे विक्रेते, फेरीवाले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोबाईलच्या कव्हरपासून ते खायच्या पदार्थांपर्यंत आणि मेकअपच्या मसामानापासून इलेक्ट्रीक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी हे फेरीवाले विकताना दिसतात. मात्र या विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या गोष्टी खरोखरच चांगल्या दर्जाच्या आणि खऱ्या असतील असं नाही. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने फेरीवाल्याकडून पॉवर बँक घेतल्यानंतर त्या पॉवर बँकमध्ये जे काही निघालं ते पाहून ग्राहक संतापल्याचं व्हिडीओत दिसत आहे.


व्हिडीओमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकोत नावाच्या हॅण्डलवरुन एका व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमध्ये हा विक्रेता कथित पद्धतीने उत्तम दर्जाच्या पॉवर बँक विकत असल्याचं दाखवत आहे. तो अगदी जोरजोरात आरडाओरड करुन या पॉवर बँक कशा चांगल्या आहेत वगैरे सांगताना दिसत आहे. एकदा चार्ज केल्यावर अनेकदा या पॉवर बँकने मोबाईल चार्ज करता येतो असा दावा हा विक्रेता करत आहे.


ग्राहक पॉवर बँक ओपन करतो अन्...


विक्रेत्याला पाहून वरच्या बर्थवर बसलेला एका प्रवासी त्याच्याकडून काही पॉवर बँक तपासून पाहण्यासाठी घेतो. या पॉवर बँकवर ब्रॅण्डेड कंपन्याची नावं लिहिलेली दिसत आहे. ग्राहक इतर काही ब्रॅण्डबद्दल या विक्रेत्याकडे चौकशी करतो. त्यावर हा विक्रेता सर्वच चांगल्या पॉवर बँक आहेत असं सांगतो. किंमत विचारली असता विक्रेता 500 रुपये असं सांगतो. मात्र 500 ची ही पॉवर बँक अवघ्या 300 रुपयांना देतो असं विक्रेता सांगतो. ही पॉवर बँक हातात घेऊन ग्राहक ती तपासून पाहत असताना पॉवर बँक उघडतो तर आतमध्ये केवळ एक सर्किट दिसून येतं. पॉवर बँक खरी आहे हे दाखवण्यासाठी आणि ती वजनदार वाटावी म्हणून त्यामध्ये चक्क चिखलाचा थर लावल्याचं ग्राहकाच्या लक्षात येतं. ग्राहक विक्रेत्याची फसवणूक रंगेहाथ पकडतो. 


नक्की वाचा >> स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?


सत्य समोर आल्यानंतर...


यासंदर्भात विक्रेत्याला विचारलं असता तो ग्राहकाच्या हातातील ही पॉवर बँक खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. विक्रेता आरडाओरड सुरु करतो आणि व्हिडीओ शूट न करण्यास सांगतो. या ग्राहकाच्या हातातील मोबाईलही खेचण्याचा प्रयत्न विक्रेता करताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



अनेकांनी व्यक्त केला संताप


अनेकांनी या व्हिडीओवरुन संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे फारशी माहिती नसणाऱ्या सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते असं अनेकांनी म्हटलं आहे. रेल्वेमध्ये अशा गोष्टी खरेदी करताना सावध राहण्याचा सल्ला अन्य एकाने दिला आहे. एकाने या प्रकाराला 'स्कॅम 2024' म्हटलं आहे. अन्य एकाने 'या विक्रेत्याचा आत्मविश्वास आपल्याला आवडला,' असा खोचक टोला लगावला आहे. तर एकाने 'सावधान राहा, सतर्क राहा', असं सांगितलं आहे.