मुंबई : तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये अॅन्ड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नुकतंच अॅन्ड्रॉईडचं नवं व्हर्जन लॉन्च झालंय... याचं नाव आहे अॅन्ड्रॉईड पी (Android P)... गूगलनं हे व्हर्जन लॉन्च केलंय.  गूगलनं आपल्या Google I/O 2018 डेव्हलपर कॉन्फरन्सला सुरुवात केलीय. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गूगलनं अनेक घोषणा केल्यात. अॅन्ड्रॉईड पी हे व्हर्जन जुन्या अॅन्ड्रॉईडपेक्षा खूप वेगळं आहे. यामध्ये अनेक नव्या सुविधा युझर्सना मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं म्हणायला गेलं तर अॅन्ड्रॉईडचं हे नवीन व्हर्जन काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आलं होतं... परंतु, तेव्हा ते टेस्टिंगसाठी बीटा व्हर्जनमध्ये जाहीर करण्यात आलं होतं. परंतु आता मात्र गूगलनं हे सर्व युझर्ससाठी लॉन्च केलंय. स्मार्टफोन युझर्सना आता हे नवीन अॅन्ड्रॉईडचं व्हर्जन कसं असेल याची उत्सुकता लागून राहिलीय. 


या अॅन्ड्रॉईड पीमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा बग मिळणार नाही... यामुळे तुमचा स्मार्टफोन खूपच फास्ट आणि स्मार्टपणे काम करणं सुरू करणार आहे. उदाहरणचं द्यायचं झालं तर जेव्हाही तुम्ही हेडफोन लावाल तेव्हा लगेचच तुम्हाला स्मार्टफोनवर प्लेलिस्ट सुरू झालेली दिसेल. त्यातही तुम्ही जी गाणी सर्वात जास्त वेळा ऐकली असतील ती गाणी तुमच्या समोर असतील. 


गूगलनं यामध्ये अॅडाप्टिव्ह बॅटरी, अॅडाप्टिव्ह ब्राईटनेस, अॅप अॅक्शन, स्मार्ट ऑटो रोटेट यांशिवाय अनेक फिचर्स उपलब्ध करून दिले आहेत. इतकंच नाही तर, तुम्ही स्मार्टफोनवर किती वेळ व्यतीत केला हेदेखील तुमचा स्मार्टफोनच तुम्हाला सांगणार आहे. जर एखाद्या अॅपवर आपण उगाचच जास्त वेळ व्यतीत करतोय असं तुमच्या लक्षात आलं तर या अॅपसाठी तुम्ही टाईम लिमिटही सेट करू शकाल.