अनेक वर्षांपासूनची भारतीयांची `ती` मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..
Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.
Google Maps News Feature: भारतीयांसाठी गुगलकडून एक गुड न्यूज आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतीयांकडून होणारी एक मागणी गुगलने अखेर मान्य केली असून लवकरच यासंदर्भातील अपडेट जारी केलं जाणार आहे. ही मागणी म्हणजे गुगल मॅप वापरताना आता उड्डाण पूल आल्यास त्याचा वापर करावा की नाही हे सुद्धा मॅपमध्ये दाखवलं जाणार आहे. मागील काही वर्षांमध्ये सातत्याने जगभरातील युझर्सकडून आणि खास करुन भारतीय युझर्सकडून हे असलं फिचर गुगल मॅप्समध्ये असावं अशी मागणी केली जात होती. अखेर ती मागणी याच आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे.
गुगल आणणार 6 नवे फिचर्स; त्यापैकी एक फारच खास
भारतीय युझर्ससाठी गुगल मॅप्समध्ये 6 नवे फिचर्स जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये भारतीयांकडून वारंवार मागणी केल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या पर्यायाचाही समावेश आहे. आता गुगल मॅपमध्ये समोर दिसणारा उड्डाण पूल वापरायचा की नाही हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. तसेच आता गुगल मॅपमध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठीचं विशेष फिचरही येणार आहे. रोज गुगल मॅप वापरणाऱ्यांचा विचार करुनही काही खास फिचर्सचा समावेश केला जाणार आहे. गुगल आता एआयच्या मदतीनेही काही खास फिचर्सचा गुगल मॅपमध्ये समावेश करणार आहे. मात्र त्यापूर्वी मागील अनेक वर्षांपासून भारतीयांकडून केली जाणारी ही उड्डाणपूलसंदर्भातील मागणी पूर्ण केली जाणार आहे.
कसं काम करणार हे फिचर?
गुगलकडून दिलं जाणारं हे अपडेट आधी अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध होईल. या फिचरचं नाव टेक फ्लायओव्हर असं आहे. म्हणजेच उड्डाणपूलाजवळ पोहचल्यानंतर गुगल मॅपमधील ऑटोमेटेड व्हॉइस समोरचा उड्डाणपूल वापरायचा आहे की नाही हे सांगणार आहे. "तुम्ही निवडलेल्या मार्गावरील उड्डाणपूल वापरायचे आहेत की नाही याची माहिती आता मॅपमध्ये दिली जाईल. यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे," असं गुगलने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. खरोखरच अनेकदा प्रवासादरम्यान चुकीचा उड्डाणपूल चढल्याने अनेकजण रस्ता चुकतात. त्यामुळे या नव्या फिचरच्या माध्यमातून मोठा दिलासाच मिळणार असून रस्ता चुकण्याचं प्रमाण कमी होईल हे निश्चित. सध्या हे फिचर सुरुवातीच्या टप्प्यात 40 शहरांमध्ये काम करणार आहे. आधी हे 2 डब्यू आणि 4 डब्ल्यू मॅप्स प्रकारामध्ये लॉन्च केलं जाणार आहे. आयफोनवरील आयओएससाठीचं अपडेट उशीरा येणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी नवं फिचर काय?
इलेक्ट्रीक वाहनांना भारतात चांगली मागणी आहे. दुचाकी असो किंवा चारचाकी भारतीयांचा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढला आहे. नव्या फिचरमुळे देशातील 8 हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत हे गुगल मॅपमध्येच दाखवलं जाणार आहे.