Google Search Results : प्रश्न कोणताही असो, त्या प्रश्नाचं उत्तर एका ठिकाणी नक्कीच मिळतं आणि ते ठिकाण म्हणजे गुगल. Google नावाचं हे सर्च इंजिन गेल्या काही वर्षांमध्ये जगण्याचाच अविभाज्य भाग झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, याच गुगलमुळं नकळत आपल्या ज्ञानातही भर पडते. पण, कळत नकळत अनेकदा गुगलच्याच माध्यमातून अशा काही गोष्टी समोर येतात ज्यामुळं प्रत्यक्षात जी माहिती मिळणं अपेक्षित असतं त्याऐवजी भलतंच काहीतरी समोर येतं आणि चुकीचे समज तयार होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकरी फसव्या वेबसाईटच्या जाळ्यात अडकत असतानाच आता गुगलनं ही बाब हेरली असून, Search Results वर नजर ठेवत आवश्यक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईअंतर्गत गुगल वायफळ माहिती देणाऱ्या संकेतस्थळांवर नियंत्रण ठेवणार आहे. असंख्य फसव्या वेबसाईटना सर्च रिझल्टमध्ये येण्यापासून रोखणार आहे. खोटे संदर्भ देत एखाद्या संकेतस्थळाच्या मदतीनं सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या अनेक आक्षेपार्ह साईटवरही गुगलचं नियंत्रण असणार आहे. 


गुगल बदलतंय, कसा होईल फायदा? 


Google कडून रँकिंग सिस्टीमला आणखी बळकटी देण्याच्या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला असून, आता ज्या संकेतस्थळांच्या माध्यमातून अधिकृत माहिती दिली जाते तिच सर्च रिझल्टमध्ये अग्रस्थानी दिसणार आहेत. त्याशिवाय बंद झालेल्या संकेतस्थळांना आणि चुकीची माहिती देण्यासाठी वापरात असणाऱ्या संकेतस्थळांना गुगल वाव देणार नाहीये.


हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 'इथं' वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होणार मोठे बदल  


सोशल मीडिया आणि गुगलवरही सध्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी, कंटेटचा भडीमार होताना दिसत आहे. अशी सर्व माहिती, सर्व कंटेट रिव्हू करत आखण्यात आलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या वेबसाईट, कंटेटला गुगलकडून बाद करण्यात येणार असून, इथून पुढं टप्प्याटप्प्यानं तुमच्या सर्च रिझल्टमधूनही या गोष्टी नाहीशा होणार आहेत. गुगलच्या या निर्णयामुळं सर्चमध्ये येणारा स्पॅम दूर होणार असून अपेक्षित प्रश्नासाठी काही अधिकृत संदर्भ आणि तत्सम उत्तरं तुम्हाला सहजपणे मिळणार आहे. यामुळं फसव्या वेबसाईटवर चापही बसणार आहे हे नक्की.