नवी दिल्ली - आतापर्यंत तुम्हाला ह्युंदाई म्हटले की एकदम कंपनीच्या कारच डोळ्यासमोर येत असतील. पण दक्षिण कोरियातील ही बहुराष्ट्रीय कंपनी लवकरच ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. कंपनीने पहिल्याच वर्षी भारतीय बाजारात ६०० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ ६० हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय धूत यांनी पत्रकारांना सांगितले की, सुरुवातीला देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये ह्युंदाईची महादुकाने सुरू करण्यात येतील. या दुकानांमधून स्मार्ट एलईडी, एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशीन आणि फ्रीज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या दुकानांच्या माध्यमातून सुरुवातीला विक्री करण्यात येईल. त्यानंतर हळूहळू देशातील इतर राज्यांमध्ये कंपनीच्या उत्पादनांचा विस्तार करण्यात येईल. 


ह्युंदाई कंपनीच्या कार खूप वर्षांपासून भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. आता इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या साह्याने कंपनीकडून अधिकाधिक भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या स्वरुपाचे डिझाईन आणि संशोधन या माध्यमातून कंपनी आपल्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारात नक्कीच जागा निर्माण करेल, अशा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय धूत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे हे स्मार्ट टीव्ही कोणत्याही सेटटॉप बॉक्स किंवा मोबाईलशी जोडले जाऊ शकतात. याचप्रमाणे एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीनमध्ये नव्या फिचरचा समावेश करण्यात आला आहे. सातत्याने नवनवीन संशोधन आणि ग्राहकांना तत्पर सेवा देण्याकडे आमचा जास्त कल असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.