नवी दिल्ली : सध्या कार, बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणं फायद्याचं ठरु शकतं. कारण सरकार फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता आहे. वाहनांवरील जीएसटी कमी झाल्यास फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, ऑटो संघटनेच्या Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) कार्यक्रमात बोलताना जीएसटी दरात कमी करणार असल्याचे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची मागणी पाहता, जीएसटी दरांमध्ये कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा करणार आहे. 


Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) चे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितलं की, फेस्टिव्ह सीजन जवळ आला आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये मागणी वाढवण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांवरील जीएसटीचे दर 28 टक्क्यांवरुन कमी करुन ते 18 टक्के केले जावेत.


दरम्यान, टू-व्हीलरवर लावण्यात येणारा GST हा लक्झरी वस्तूप्रमाणे मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येतो. केंद्र सरकार वाहन क्षेत्रातील उद्योगासाठी जीएसटीबाबत मोठी घोषणा करु शकते. यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचे संकेत दिले होते. टू-व्हीलर लक्झरी वस्तू नाही किंवा ती अहितकारी वस्तूही नाही. त्यामुळे टू-व्हीलरवरील जीएसटीबाबतचा प्रस्ताव जीएसटी काउंसिलच्या बैठकीत मांडणार असल्याचं, निर्मला सीतारमण यांनी सांगतिलं होतं.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं हे विधान 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी आलं होतं. त्यामुळे होणाऱ्या बैठकीत दुचाकी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत दुचाकीच्या मागणीत वाढ होऊन, विक्रीही वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या संकटामुळे वाहनांची विक्री कमी झाली आहे. जीएसटी कमी झाल्यास सर्वसामान्यांसह, ऑटो सेक्टरलाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.