मुंबई : बँक अकाऊंटमधून पैसे हॅक करण्याविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल. एटीएमबदलून किंवा फोन करून पासवर्ड मागून, बँक अकाऊंटमधून पैसे ऑनलाईन चोरी करण्याचं प्रकरण आता जुनं झालं आहे. आता मोबाईल सिम स्वॅप करून पैसे लुटले जातात, आणि तुम्हाला एक मेसेजही येत नाही. आता तुमच्या मोबाईल सिमचा वापर करून, तुमच्या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. 


ऑनलाईन चोरी करण्याची पद्धत बदलली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चोरी करताना तुम्हाला अज्ञात व्यक्तीकडून बँकेतून बोलत असल्याचा फोन येतो, मात्र आम्ही येथे सांगू इच्छितो, तुम्हाला बँकेतून, किंवा मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचा फोन येतो, तेव्हा अशा व्यक्तीला तुमची व्यक्तिगत किंवा अकाऊंटचे पासवर्डची माहिती विचारली तर सांगू नका. 


तुम्हाला सुरूवातीला अशा प्रकरणात घाबरवलं जातं, जसं की तुमचं बँक अकाऊंट बंद होईल. आता नव्या पद्धतीत सांगितलं जात आहे, तुमचं मोबाईल सिम अपडेट नाही, ते बंद होईल. अशावेळी सावध राहा, कारण अनेक लोकांना सिम अपडेटच्या नावाखाली लाखो रूपयांना लुटलं जात आहे.


'स्विमस्वॅप'ने युवकाला ४ लाखाला लुटलं


दिल्लीत काही दिवसांपूर्वी एका युवकाला सिम स्वॅपिंग प्रकरणात ४ लाखाला लुटलं आहे. याआधी पुण्यातही एका व्यक्तीला एका लाखाला लुटण्यात आलं होतं. जर तुम्हाला किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला संशयित कॉल आला तर सावध राहा. तर आता जाणून घ्या की स्विम स्वॅप काय असतं, आणि आपण कसे लुटले जातो.


सिम स्वॅपचा नेमका अर्थ काय?


सिम स्वॅपचा सरळ अर्थ आहे, सिम बदलून टाकणे. यात आपल्या फोन नंबरवरून एक नव्या सिमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. असं झाल्यानंतर तुमचं सिमकार्ड लगेच बंद पडतं. तुमच्या फोनवर मोबाईल टॉवरचे सिग्नल दिसणं बंद होतं.


हे एवढं पटकन होतं की, तुम्हाला समजतंच नाही की एवढ्या काही सेकंदात किंवा जास्तच जास्त २ ते ३ मिनिटात हे काय झालं? जेव्हा आपल्याला कळतं की काय झालं?, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 


हॅकर तुमच्या नव्या सिमवरील, तुमच्या जुन्या नंबरला ओटीपी नंबर मागवतो आणि दुसऱ्या सिमवर ओटीपी मागवून तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे ऑनलाईन चोरून नेतो.


स्विम स्वॅपिंगची सुरूवात अशी होते...


स्विम स्वॅपिंगची सुरूवात अशी होते... एक कॉल येतो, फोनवर बोलणारा आपल्याला असं सांगतो की, मी टेलिकॉम कंपनी मधून बोलतोय. तो असं सांगतो की, तुमचं मोबाईल सिम अपडेट नाहीय. 


सिम अपडेट झालं की, तुमचा कॉल कट होणार नाही, नेटवर्क छान मिळेल, स्पष्ट आवाज येईल, असं तो सांगतो, तसेच इंटरनेटचा स्पीड वाढेल असंही तो आमिष देतो.


यानंतर तो तुमच्या सिमकार्डवर लिहिलेला २० आकड्यांचा युनिक नंबर मागतो. अनेक जण हा २० आकडी नंबर त्याला सांगतात. हा सिमचा युनिक नंबर असतो.


युनिक नंबर मिळाल्यानंतर हा फोनवर बोलणारा माणूस १ प्रेस करण्यास सांगतो. ज्यामुळे ऑथेन्टिकेशन आणि नवीन सिम स्वॅपची प्रोसेस पूर्ण होते, सिम स्वॅप झालं की, तुमच्या फोनवरचे सिग्नल गायब होतात. 


दुसरीकडे चोरी करणाऱ्या माणसाकडे असणाऱ्या सिमकार्डला सिग्नल येतो, म्हणजे तुमच्या नंबरला येणारे सर्व मेसेज त्याला येतात. 


या माणसाकडे तुमचा बँकिंग आयडी आणि पासवर्ड बदलण्याचे अधिकार आपोआप येतात, कारण बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर 'वन टाईम पासवर्ड' (ओटीपी) येतो.