TikTok अॅपला मोठा झटका, बंदी आणण्याचे कोर्टाचे आदेश
कमी काळात कमालीचे लोकप्रिय ठरलेले चायनीज अॅप टिकटॉक (TikTok) ला मोठा झटका बसला आहे.
सुस्मिता भदाणे, मुंबई : कमी काळात कमालीचे लोकप्रिय ठरलेले चायनीज अॅप टिकटॉक (TikTok) ला मोठा झटका बसला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला टीकटॉकवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिला यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे बंदी उठणार की कायम राहणार याची उत्सुकता तरुणांना लागली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘टिकटॉक’ या म्युझिकल व्हिडीओ अॅपने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करत होते. पण कित्येकदा ‘टिकटॉक’द्वारे अश्लील व्हिडीओही तयार करण्यात येतात. त्यामुळे ‘टिकटॉक’वर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. देशातील संस्कृतीला धोका असल्यानं अॅपवर बंदी घालण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती.
अमेरिकेत 18 वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रेन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन कायदा आहे. मग तसाच कायदा आपल्याकडे का तयार केला जात नाही, असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच लवकरात लवकर इतर देशाप्रमाणे आपल्या देशातही 18 वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रेन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन कायदा करावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याबाबत पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे.
काय आहे टिकटॉक?
टिकटॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. 73 एमबीचे हे अँप असून याचे ५० कोटी पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. टिकटॉक अॅपच्या मदतीने छोटे व्हिडिओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. या अॅपचे सध्या भारतात दीड कोटी वापरकर्ते आहेत. बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे तरुणाईचे लक्ष आहे.