देशातील अनेकजण चारचाकी विकत घेताना महिंद्राच्या गाडीला पंसती देतात. महिंद्राच्या गाड्यांच्या फिचर्ससह त्यांची मजबूती ग्राहकांना आकर्षित करत असते. जर तुम्ही महिंद्राची कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर कंपनीने एक नवी गाडी भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. महिंद्राने आपली प्रसिद्ध Mahindra XUV300 चं ग्राहकांच्या खिशाला परवडेल असं 'W2' व्हेरियंट लाँच केलं आहे. कंपनीने एसयुव्हीच्या या नव्या व्हेरियंटला फक्त पेट्रोल इंजिनसह बाजारपेठेत आणलं आहे. या कारची किंमत 7 लाख 99 हजार (Ex Showroom) रुपये आहे. याशिवाय 'W4' व्हेरियंटमध्ये आणखी एक नवा ट्रिम जोडण्यात आला आहे, जो टर्बो स्पोर्ट व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. याची किंमत 9 लाख 29 हजार ठरवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत 1.2 लीटर क्षमतेचं mStallion TGDi पेट्रोल इंजिन 'W6' व्हेरियंटपासून सुरू होत होतं. पण आता ग्राहकांना ते 'W4' प्रकारातही मिळू शकतं. या इंजिनसंबंधी कंपनीचा दावा आहे की, हे इंजिन कारला 5 सेकंदात 0 ते 60 किमी ताशी वेग पकडण्यात सक्षम बनवतं. हे इंजिन 131Hp ची पॉवर आणि 230Nm चा टॉर्क जनरेट करतं. याशिवाय 'W4' व्हेरियंटमध्ये सनरुफसारखं फिचरही मिळणार आहे, जे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनसह उपलब्ध आहे. 


या नव्या व्हेरियंटच्या लाँचसह ही एसयुव्ही एकूण 5 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये W2, W4, W6, W8, आणि W8 (पर्यायी) यांचा समावेश आहे. नव्या बेस 'W2' व्हेरियंटची किंमत 'W4' च्या बेस मॉडेलच्या तुलनेत 66 रुपये कमी आहे, जी आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. ही एसयुव्ही या सेगमेंटमधील सर्वात चांगला परफॉर्मन्स देणारी कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 


फिचर्स काय आहेत?


Mahindra XUV300 मध्ये कंपनीने अनेक चांगले फिचर्स दिले आहे. याच्या केबिनमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 6-वे मॅन्युअल अॅडजस्टेबल फ्रंट ड्रायव्हर सीट, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह येणारी 9-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि स्टीयरिंग-माउंटेड डिस्प्ले व्यतिरिक्त डायनॅमिक असिस्टसह मागील पार्किंग डिस्प्ले मिळते. याशिवाय क्रूझ कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फिचर्स देण्यात आले आहेत. 


या एसयुव्हीमधील दुसऱ्या रांगेतील सीट 60-40 प्रमाणात फोल्ड केली जाऊ शकते. यामध्ये 275 लीटरचा बूट स्पेस मिळतो. तसंच 180 मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो जो या एसयुव्हीला कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर विना अडथळा धावण्यात मदत करतो. तसंच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, ऑल व्हिल डिस्क ब्रेक, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सॉरही मिलतात.