Maruti Recalls 87599 Units: देशातील सर्वात मोठ्या कार निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुति सुझुकी इंडियाने (एमएसआयने) स्टेअरिंग रॉडमधील समस्येमुळे हजारो गड्या परत मागवल्या आहेत. एस-प्रेसो आणि ईको मॉडलच्या 87 हजार 599 गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये या सदोष गाड्यांचं उत्पादन 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आल्याचं सांगितलं. या गाड्यांच्या स्टेअरिंग रॉडमध्ये तांत्रिक अडचणी असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने कंपनी गाड्या परत मागवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.


कंपनीने काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने नेमका काय गोंधळ झाला आहे यासंदर्भातील माहितीही दिली आहे. "या वाहनांमध्ये वापरण्यात आलेली स्टेअरिंग रॉडच्या काही भागांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्टेअरिंग वापरताना अडचणी निर्माण होत आहेत," असं कंपनीने म्हटलं आहे. एस-प्रेसो आणि ईको गाड्यांच्या मलकांनी जवळच्या मारुति सुझुकी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधावा असं कंपनीने सांगितलं आहे. या वाहनांमधील सदोष भागांची मोफत रिपेरिंग करुन दिली जाईल असं कंपनीने सांगितलं आहे. ही प्रक्रिया 24 जुलैपासून सुरु झाली आहे. वाहन खरेदीसंदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन ग्राहकांनी सर्व्हिस सेंटरला जाऊन सदोष भाग बदलून घेण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतातील कोणत्याही वाहन कंपनीने एवढ्या मोठ्याप्रमाणात गाड्या रिकॉल करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.


टीव्हीएस मोटरला 434 कोटींचा नफा


टीव्हीएस मोटर कंपनीला 30 जून 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिहामाहीमधील नफ्यात 42 टक्के वाढ झाली आहे. हा नफा 434 कोटी इतका आहे. उत्पादन विक्रीमध्ये सातत्य असल्याने कंपनीला हा नफा झाला आहे. कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीमध्ये म्हणजेच एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये 305 कोटींचा निव्वळ नफा कमवला होता. टीव्हीएस मोटर कंपनीने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये जूनच्या तिमाहीमध्ये एकूण कमाई 9 हजार 142 कोटी इतकी झाली आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा 7 हजार 348 कोटी इतकी होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून 2023 च्या शेवटी निर्यात केलेल्या गाड्यांची संख्या गृहित धरुन दुचाकी आणि 3 चाकी गाड्यांची विक्री 5 टक्क्यांनी वाढली. एकूण 9.53 लाख वहाने विकली गेली. मागील वर्षी म्हणजेच 2021-22 मध्ये हा आकडा 9.07 लाख इतका होता.