Alto ची जादू संपू लागली, टॉप 10 यादीतून बाहेर; `या` तीन गाड्यांना सर्वाधिक पसंती
Top 10 Cars: Maruti Alto 800 ची निर्मिती आता कंपनीने बंद केली आहे. मात्र Alto K10 ची विक्री अद्याप सुरु आहे. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवडीची Alto टॉप 10 यादीत नसण्याची जवळपास ही पहिलीच वेळ असेल.
Top 10 Selling Cars: सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंब नेहमीच Maruti Alto कारला पसंती देतात. बजेटमध्ये असणारी ही कार चांगला मायलेजही देते. गेल्या अनेक काळापासून या कारने मार्केटमधील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. पण आता मात्र या कारला मिळणारी पसंती कमी होताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या आवडीच्या कारमध्ये आता Alto चं स्थान खाली घसरलं आहे. याचं कारण म्हणजे गेल्या मार्च महिन्यात झालेल्या वाहन विक्रीची आकडेवारी हेच दर्शवत आहे. टॉप 10 विक्री झालेल्या कारच्या यादीत Alto ला स्थान न मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.
मारुती सुझुकीने नुकतंच Alto 800 ची निर्मिती बंद करत असल्याची घोषणा केली होती. पण मार्केटमध्ये अद्यापही Alto K10 विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह सीएनजीतही उपलब्ध आहे. जवळपास 23 वर्षांपूर्वी 2000 मध्ये मारुतीने Alto 800 ला लाँन्च केलं होतं. दोन दशकांहून अधिक काळ ही कार देशवासियांची आवडती कार राहिली आहे. पण आता मात्र कारच्या विक्रीत सतत घसरण होताना दिसत आहे.
Maruti Swift पहिल्या क्रमांकावर
मार्च महिन्याचा सेल्स रिपोर्ट पाहिल्यास Maruti Swift ला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. कंपनीने या कारच्या एकूण 17 हजार 559 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षातील मार्च महिन्यात या कारच्या 13 हजार 623 युनिट्सची विक्री झाली होती. तर Wagon R दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने Wagon R च्या 17 हजार 305 युनिट्सची विक्री केली आहे. दरम्यान देशात विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या Maruti Brezza च्या एकूण 16 हजार 227 युनिट्सची विक्री झाली आहे.
टॉप 10 बेस्ट सेलिंग कारमध्ये आता हॅचबॅक गाड्यांची संख्या कमी होत आहे. आता या गाड्यांची जागा एसयुव्ही घेत आहे. मारुती सुझुकी अल्टो 9139 युनिट्ससह विक्रीत 14 व्या स्थानी राहिली आहे. पण गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या विक्रीच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली आहे.
Alto 800 ची निर्मिती बंद करण्यात आली तेव्हा कारची किंमत 3 लाख 54 हजार इतकी होती. दरम्यान Alto K10 ला कंपनीने एंट्री लेव्हलवर आणलं असून याची किंमत 3 लाख 99 हजार ते 5 लाख 94 हजारांपर्यंत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हॅचबॅक कारच्या मागणीत घसरण होत आहे. ग्राहक आथा कॉम्पॅक्ट एसयुव्हीला पसंती देताना दिसत आहेत. गेल्या मार्च महिन्यातील टॉप 10 यादीत पाच गाड्या एसयुव्ही सेगमेंटमधील आहेत. यामध्ये ब्रेझा, क्रेट आणि नेक्सॉन आघाडीवर आहेत. बजेटमध्ये बसत असल्याने तसंच चांगला मायलेज आणि स्पोर्ट लूक यामुळे एसयुव्ही गाड्या पंसतीस उतरत आहेत.