नवी दिल्ली : देशातली गाडी बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी मारुती सुझुकीनं इतिहास घडवला आहे. कंपनीच्या मानेसार आणि गुरुग्राम प्लांटमधून आत्तापर्यंत तब्बल २ कोटी गाड्यांचं प्रॉडक्शन झालं आहे. डिसेंबर १९८३ मध्ये मारुती सुझुकीनं कार उत्पादन सुरु केलं होतं. आता ३४ वर्ष ६ महिन्यांनंतर कंपनीनं २ कोटी गाड्यांचं उत्पादन करण्याचा रेकॉर्ड केला. या दोन्ही प्लांटमधून स्विफ्ट, डिझायर, विटारा ब्रेजा, ऑल्टो, वेगन आर या गाड्यांचं उत्पादन होतं.


मारुतीच्या विक्रीमध्ये वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या महिन्यामध्ये ३ लाख विटारा ब्रेजाची विक्री झाली. तर यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च करण्यात आलेली नवीन स्विफ्टची १० लाख युनिट्स विकली गेली. २ कोटी गाड्यंपैकी १४३.७० लाख गाड्या गुरुग्राममध्ये तर उरलेल्या ५६.२ कोटी गाड्या मानेसारमध्ये बनवण्यात आल्या होत्या.


अशी वाढली मारुतीची विक्री


उत्पादन सुरु केल्यानंतर एका दशकानंतर १९९४ मध्ये मारुतीनं १० लाख गाड्या बनवल्या होत्या. यानंतर २००५ साली कंपनीनं ५० लाख गाड्या बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मारुती सुझुकीनं २०११ साली १ कोटी गाड्या बनवण्याचं लक्ष्य पूर्ण केलं. यानंतर आता ७ वर्षांनी मारुतीच्या २ कोटी गाड्या बनल्या.


मारुतीची १६ मॉडेल बाजारात


मारुती सुझुकीची सध्या १६ मॉडेल भारतीय बाजारात आहेत. तसंच या गाड्या युरोपियन देश, जपान, आशियाई देश, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेच्या १०० देशांमध्ये निर्यात केल्या जातात.


मारुती ३५ वर्ष पूर्ण करणार


मारुतीचं कामकाज सुरु होऊन आता ३४ वर्ष ६ महिने उलटले आहेत. मारुती ८००, 'SS800' या दोन गाड्या मारुतीनं १६ डिसेंबर १९८३ साली आणल्या होत्या. डिझायर, स्विफ्ट, बलेनो आणि विटारा ब्रेजा या गाड्यांची मागणी वाढल्यामुळे मारुतीनं २ कोटी गाड्यांचं लक्ष्य लवकर पूर्ण केलं.