NIKEचे जबरदस्त स्मार्ट शूज लॉन्च, फिचर्स पाहून हैराण व्हाल!
स्पोर्ट्स वियर आणि स्पोर्ट्स शूज बनवणारी कंपनी NIKE नं त्यांचे स्मार्ट शूज लॉन्च केले आहेत.
मुंबई : स्पोर्ट्स वियर आणि स्पोर्ट्स शूज बनवणारी कंपनी NIKE नं त्यांचे स्मार्ट शूज लॉन्च केले आहेत. या स्पोर्ट्स शूजचे फिचर्स ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. या बुटांमध्ये पाय टाकल्याबरोबर सेंसर तुमच्या पायाच्या आकारानुसार बुटाचा आकार बदलतो. तुमचा पाय कसाही असला तरी हे स्मार्ट शूज तुमच्या पायात फिट बसतात. एवढच नाही तर बूट घातल्यानंतर बुटाच्या लेसही आपोआप बांधल्या जातात. मोबाईल ऍपच्या एका क्लिकवर तुम्ही बुटाची लेस बांधू शकता. या बुटांचं नाव Nike Adapt BB आहे. १७ फेब्रुवारी २०१९ पासून हे बूट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या बुटांची किंमत ३५० अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे २५ हजार रुपये एवढी आहे.
NIKEच्या या प्रॉडक्टमुळे बुटांच्या विश्वात डिजीटल युगाचा आरंभ झाला आहे. NIKE चे हे बूट तुमच्या स्मार्टफोनला कनेक्टेड असतील. स्मार्टफोनच्या माध्यमातूनच या बुटांना नियंत्रित करता येईल. बूट पायाला घट्ट किंवा सैल होत असतील तर मोबाईल ऍपच्या मदतीनं तुम्ही बूट फिट करू शकता. जर हे बूट तुम्ही ऑटोमेटिक फिटिंग मोडवर ठेवले तर बुटांमधला सेन्सर पायाच्या आकारानुसार बुटांचा आकार स्वत:हून बदलेल. पायाच्या आकारानुसार बूट सैल किंवा घट्ट होईल.
NIKEनं हे बूट खास बास्केटबॉल खेळाडूंच्या मागणीनंतर बनवले आहेत. खेळताना बूट पायात नीट बसत नसल्यामुळे आणि बुटांची लेस सारखी सुटत असल्यामुळे खेळाडूंनी वेगळ्या प्रकारच्या बुटांची मागणी केली होती, असं NIKE चे क्रिएटिव्ह डायरेक्टर एरिक अवार यांनी सांगितलं.