क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार `LOCK`, तुम्ही ठरवा कधी उघडायचं...
सध्या काही बँका ग्राहकांना हवे तेव्हा तात्पुरत्या काळासाठी कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात
मुंबई : आता क्रेडिट आणि डेबिट कार्ड पाहिजे तेव्हा बंद करण्याची सुविधा लवकरात लवकरात उपलब्ध करून द्या, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व कार्ड बनवणाऱ्या कंपन्या आणि बँकांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवहारांमुळे ग्राहकांना सातत्यानं कार्डचा वापर करावा लागतो. त्यात माहिती लीक होऊन ग्राहकांचे पैसे जाण्याचे प्रकारही वाढलेत. हाच धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं हे निर्देश दिले आहेत. सध्या काही बँका ग्राहकांना हवे तेव्हा तात्पुरत्या काळासाठी कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात. त्याच धर्तीवर ग्राहकांना कार्ड स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची सूचना रिझर्व्ह बँकेनं केलीय.
रिझर्व्ह बँकेनं सूचवलेल्या या पर्यायामुळे आपलं डेबिट - क्रेडिट कार्डच्या सेवा कधी सुरू करायच्या आणि कधी बंद करायच्या याचा निर्णय तुमची बँक नाही तर तुम्ही घेऊ शकाल. याशिवाय आरबीआयनं कोणत्याही पद्धतीची खरेदी किंवा सेवा सुरू किंवा बंद करण्याचे स्वातंत्र्यही ग्राहकांना देण्याचे निर्देश बँकांना दिलेत.
सध्या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, एटीएमचा वापर, ऑनलाईन खरेदी आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये कार्ड स्वाइप करणं इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंगचा वापर करत नसाल तर तुम्ही ही सेवा स्वत:च बंद करू शकाल.
याशिवाय अनेक कार्डसना आंतरराष्ट्रीय वापरासाठी अगोदरपासूनच परवानगी असते. यामुळे, कार्डमधल्या पैशांचा धोका आणखी वाढतो. आरबीआयचे निर्देश अंमलात आल्यानंतर तुम्ही डेबिट - क्रेडिट कार्डमधून या सुविधा स्वत:च हटवू शकाल.
परंतु, बँकांना ट्रान्झक्शन अलर्ट, वेळोवेळी अकाउंटची माहिती किंवा उर्वरीत रक्कमेची माहिती एसएमएस किंवा ई-मेल द्वारे ग्राहकांना द्यावीच लागणार आहे. या सेवांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.