सणासुदीच्या दिवसांमध्ये ओलाच्या विक्रीत तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी दिली आहे. भावीश अग्रवाल यांनी एक्सवर पोस्ट करत सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये विक्रीत 30 टक्के वाढ झालं असल्याचं सांगितलं आहे. विक्री वाढण्याचं श्रेय त्यांनी आपली टीम आणि कर्मचाऱ्यांना दिलं असून सणांमधील वाढती मागणी पूर्ण कऱण्यासाठी ते 70 पेक्षा जास्त तास काम करत असल्याचं सांगितलं आहे. इंफोसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी तरुणांनी आठवड्यातील 70 तास काम करावं असा सल्ला दिला होता. यावरुन वाद पेटलेला असतानाच भावीश अग्रवाल यांनी मुद्दामून हा संदर्भ दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावीश अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "ओला इलेक्ट्रिक टीमला सणांच्या मोसमात चांगली सुरुवात मिळाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये विक्री 30 टक्क्यांनी वाढली आहे. फ्युचरफॅक्टरी पूर्ण वेगाने काम करत असून, प्रत्येकजण मागणी पूर्ण करण्यासाठी 70 पेक्षा जास्त तास काम करत आहे. भारतात इलेक्ट्रि वाहनांसाठी 2023 एक महत्त्वाचं वर्ष असणार आहे".



गेल्या आठवड्यात भावीश अग्रवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सणांच्या दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं सांगितलं होतं. 10 सेकंदाला एक स्कूटर विकली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 



ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेत पाच इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केलेल्या आहेत. ऑगस्टमध्ये, कंपनी तीन नवीन मॉडेल्स घेऊन आली.  S1 Air, S1 Pro Gen2 आणि S1X, प्रत्येक तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे स्कूटर्स 90 हजार ते 1 लाख 47 हजारांपर्यंत (एक्स-शोरूम) उपलब्ध आहेत. 


दुसऱ्या एका ट्वीटमध्ये भावीश अग्रवाल फॅक्टरीच्या बाहेर उभे आहेत. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलं होतं की, "फक्त 70 नाही तर 140! फक्त मजा, विकेंड नाही".


नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत?


"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले आहेत. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला.