काही तासांतच पेटीएम Google Play Storeवर पुन्हा उपलब्ध
गूगलच्या कारवाईनंतर काही तासांमध्येच पेटीएम ऍप गूगल प्ले स्टोरवर पुन्हा उपलब्ध झालं आहे. आता यूजर्स प्ले स्टोरवरुन पेटीएम ऍप डाऊनलोड करु शकतात.
नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट ऍप पेटीएमची (Paytm)गूगल प्ले स्टोरवर (Google Play Store) पुन्हा एकदा वापसी झाली आहे. गूगलच्या कारवाईनंतर काही तासांमध्येच पेटीएम ऍप गूगल प्ले स्टोरवर पुन्हा उपलब्ध झालं आहे. आता यूजर्स प्ले स्टोरवरुन पेटीएम ऍप डाऊनलोड करु शकतात. कंपनीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
18 सप्टेंबर रोजी गूगल प्ले स्टोरने पेटीएमवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावत, ऍप गूगल प्ले स्टोरवरुन हटवलं होतं. 'आम्ही कोणत्याही गँम्बलिंग (जुगार), ऑनलाईन कॅश गेम्स ऍपचं समर्थन करत नसल्याचं' सांगत, गूगलने पेटीएम प्ले स्टोरवरुन हटवल्याचं कारण सांगितलं होतं.
गूगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, 'आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही. जो युजर्सला दुसऱ्या साईटवर घेऊन जातो त्याचं आम्ही समर्थन करत नाही. जर कोणतं ऍप ग्राहकाला दुसऱ्या वेबसाईटवर घेऊन जात असेल आणि तेथे पैसे जिंकण्यासाठी एखाद्या टुर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी सांगत असेल तर ते आमच्या नियमांचं उल्लंघन आहे.'
'PayTM First Games' द्वारे पैसे जिंकण्याचा दावा केला होता. ज्यामुळे गूगलने पेटीएम कंपनीवर ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर पेटीएमचे डेव्हलपर्स सतत गूगलच्या अधिकाऱ्यांसह या समस्येचं निराकरण करत होते. त्यानंतर काही तासांतच कंपनीने ट्विट करत पुन्हा गूगल प्ले स्टोरवर आल्याची माहिती दिली.
गूगलकडून हे स्पष्ट करण्यात आलं होत की, जोपर्यंत ऍप गूगलच्या नियामक अटींच्या अखत्यारित आणलं जात नाही तोपर्यंत, पेटीएमवरील निर्बंध, बंदी कायम राहणार असल्याचं गूगलकडून सांगण्यात आलं होतं.