मुंबई : Electric And CNG Vehicles: इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पश्चिम बंगाल राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या खरेदीवरील नोंदणी आणि इतर अनेक शुल्क माफ केले आहेत. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ग्राहकांना हा लाभ मिळेल. यामुळे ग्राहकांना अनुदान तर मिळेलच, पण पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते खूप चांगले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी नोंदणी शुल्कासह मोटर वाहन आणि इतर अनेक कर माफ केले आहेत. याशिवाय सीएनजी वाहने घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनाही हे सर्व फायदे राज्यात मिळणार आहेत. शुक्रवारी पश्चिम बंगाल राज्य सरकारने या निर्णयाला मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी सरकारने नवीन इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह CNG कार खरेदी करणाऱ्यांना ही भेट दिली आहे, ज्याचा लाभ 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 दरम्यान घेता येईल.


राज्य सरकारने दिले होते आश्वासन


ज्या ग्राहकांनी 1 एप्रिल ते 27 मे दरम्यान इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वाहने खरेदी केली आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही. तथापि, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 दरम्यान कर भरणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून कर वैधतेच्या रुपात आर्थिक मदत मिळेल. या निर्णयामुळे राज्य सरकारचे यंदाच्या अर्थसंकल्पात दिलेले आश्वासनही पूर्ण झाले आहे. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्वातून सुटका करून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे बनले आहे, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. याशिवाय ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासही प्रोत्साहन दिले जाईल.


लगेच निर्णय का घेतला गेला?


हिंदुस्थान मोटरने कोलकाताजवळ प्लांट बांधल्याची बातमी बाजारात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या राज्यात आलिशान अ‍ॅम्बेसेडर कारचे उत्पादन झाले होते. हिंदुस्थान मोटरने भारतात पुन्हा प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रिक कार बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी कंपनीने पुझोसोबत सामंजस्य करार केला आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की येत्या 2 वर्षात कंपनी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल.