मुंबई : जगभरातील दिग्गज आणि प्रतिष्ठीत व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंटवर निशाणा साधत एक वेगळीच दहशत निर्माण केल्यानंतर सोशल मीडियावर असणाऱ्या विविध अकाऊंटच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्व आखून देण्यात आली आहेत. ज्यावर लक्ष दिलं जाणं अत्यावश्यक असल्याची बाब प्रकर्षानं समोर येऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलं कुटुंब किंवा मित्रपरिवार यांपैकी कोणालाही SMS वेरिफिकेशन कोड न सांगण्याचा सल्ला WhatsAppकडून देण्यात आला आहे. तुम्ही यापूर्वीच असं केल्यास तातडीनं अकाऊंट रिकव्हर करण्याची पावलं उचलली जाण्याची गरज आहे. 


अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच काय करावं? 


अकाऊंटचा कोड वगैरे माहिती अनपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहचून अकाऊंटवर इतर कोणाचं नियंत्रण आल्याचं लक्षात येताच मित्रपरिवार, तुमच्या संपर्कातील मंडळी यांना शक्य तितक्या लवकर याबाबतची माहिती द्या. 


पुढची पायरी म्हणजे तुमच्या दुरध्वनी क्रमांच्या अर्थात फोन नंबरच्या माध्यमातून WhatsAppवर लॉगईन करा. ज्याअंतर्गत तुम्हाला ६ आकडे असणारा एक वेरिफिकेशन कोड SMSच्या माध्यमातून तुमच्या फोन नंबरवर देण्यात येईल. हा कोड वापरुन लॉगईन केल्यास तुमचं अकाऊंट दुसरं कोणी वापरत असल्यास आपोआपच ते लॉगआऊट झालेलं असेल.


 


गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या विविध घटना आणि त्यादरम्यानच समोर येणारी सायबर क्राईमची प्रकरणं पाहता ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया अकाऊंट अशा माध्यमांमध्ये सतर्क राहण्याचीच गरज आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचं लक्षात येताच प्राथमिक स्तरावर तोडगा न निघाल्यास तातडीनं संबंधित यंत्रणांकडे याची नोंद करणं महत्त्वाचं आहे.