Cyrus Mistry यांच्या अपघाती निधनानंतर Mercedes-Benz कंपनीचं वक्तव्य, कारच्या चिपमधून...
मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने Cyrus Mistry मुंबईकडे जात असताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Mercedes-Benz On Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात (Cyrus Mistry Accident) निधन झाले. मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने ते मुंबईकडे जात असताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये एकूण चार जण होते आणि त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आता या अपघातप्रकरणी लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझचे (mercedes benz) वक्तव्य समोर आलं आहे. कार अपघाताच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचा दावा मर्सिडीज बेंझने केला आहे. दुसरीकडे, अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही कार अतिशय सुरक्षित मानली जाते. यात अनेक वैशिष्ट्ये आहेत, जे अपघाताच्या वेळी आत बसलेल्या लोकांचे संरक्षण करतात.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मर्सिडीज-बेंझ कंपनीने निवदेनात सांगितले की, "अपघाताशी संबंधित तपासात मदत करत आहोत. आमच्या ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करत एक जबाबदार ब्रँड म्हणून, आमची टीम आवश्यकतेनुसार अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे," निवेदनात पुढे म्हटले आहे की, "आम्ही आवश्यक माहिती तपास अधिकाऱ्यांना देऊ. यापूर्वी कंपनीच्या पथकाने अपघातस्थळाची आणि अपघातग्रस्त वाहनाचीही पाहणी केली होती."
जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप घेतली आहे. तसेच ती चिप जर्मनीला पाठवण्यात आली आहे. या चिपचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे अपघाताच्या परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येण्यास मदत होईल. अपघात कशामुळे झाला? अपघाताच्या वेळी कारचा वेग काय होता? कोणत्या एअरबॅग्ज कार्यरत होत्या? कारचे ब्रेक कार्यरत होते का? आणि इतर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.