पुन्हा येत आहे टाटाची नॅनो, पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर
तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार `टाटा नॅनो` (Nano) पुन्हा येत आहे.
नवी दिल्ली : तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' (Nano) पुन्हा येत आहे.
टाटा नॅनो नव्या रुपात होणार लॉन्च
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटाने आपली नॅनो कार पुन्हा लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी टाटा नॅनो पुन्हा लॉन्च करण्यात येणार आहे.
नॅनोचं नाव बदललं
टाटाच्या नॅनो कारचं नाव बदलून 'जायेम नियो' (Jayem Neo) असं ठेवत लॉन्च केलं जाण्याची माहिती समोर येत आहे.
मोदींच्या हस्ते लॉन्चिंग?
मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटाच्या नव्या 'जायेम नियो' (Jayem Neo) कार २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्चिंग होणार आहे.
नॅनोचं इलेक्ट्रिक वर्जन
नवी टाटा नॅनो इलेक्ट्रिक वर्जनसह (EV) बाजारात लॉन्च केली जाणार आहे. इलेक्ट्रिक कारसाठी टाटा मोटर्स आणि कोयंम्बतूर येथील जायेम ऑटोमोटिव्ह कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सच्या मते, जायेम मोटर्स कारची बॉडी तयार करणार आहे त्यानंतर कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर फिट करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक कार बाजारात आल्याने प्रदूषणाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
ओलाने लॉन्चिंगपूर्वीच केली बुकिंग
टाटा मोटर्सला ओलाकडून ४०० इलेक्ट्रिक नॅनो कारची ऑर्डर यापूर्वीच मिळाली आहे. 'जायेम नियो' (Jayem Neo) इलेक्ट्रॉनिक कारला फुल चार्ज केल्यानंतर १४० किमी चालवता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रिक सिस्टमवर चालणारी ही कार १७ Kw (२३ hp) जनरेट करेल.
टाटा नॅनो कारचं इलेक्ट्रिक वर्जन हे केवळ कमर्शिअल वापरासाठी बाजारात येत आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.