इंटरनेटशिवाय अशा रितीनं वापरा Google Maps
ऑफलाईन असतानाही हे शक्य...
मुंबई : हाती असणारा स्मार्टफोन हा गेल्या काही काळापासून अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त उपकरणांपैकी एक आहे. जीवनातील अनेक कामं सुकर करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या इंटरनेटचीही यात महत्त्वाची भूमिका. यातच गुगल मॅप्सचा सातत्यानं वाढणारा वापरही लक्षवेधी. स्मार्टफोनमधून मिळणाऱ्या जीपीएस सेवेच्या मदतीनं तुम्ही फक्त तुमचंच लोकेशन शेअर करु शकता असं नाही. तर, कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला सहज अपेक्षित स्थळी पोहोचता येऊ शकतं.
तुम्ही कोणा एका नव्या ठिकाणी असाल तर अशा वेळी गुगल मॅप्स हे सर्वाधिक उपयुक्त असं नेव्हिगेशन टूल ठरतं. पण, अनेकदा याचा वापर होईलच असं नाही. मुख्यत्वे अशा वेळी जेव्हा तुमच्या फोनमध्ये इंटरनेट एक्सेस नसेल, किंवा सेल्युलर नेटव्हर्कमध्ये काही अडचण असेल. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? ऑफलाईन असतानाही तुम्हाला GPS वापरात येणं सहज शक्य आहे.
असं करण्यासाठी तुम्हाला काही टप्पे पार करावे लागणार आहेत. एँड्रॉईड डिव्हाइस किंवा आयफोनवर ऑफलाइन GPS सुरु करण्यासाठी आणि मॅप्सचा एक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही आधीच लोकेशन अर्थात ठिकाण सेव्ह करणं अपेक्षित असेल.
अशा रितीनं सुरु करा ऑफलाईन GPS
कोणा एका ठिकाणी सहलीसाठी किंवा इतर कोणत्या कारणानं गेलं असता अनेकदा मोबाईल सेल्युलर डेटामध्ये अडचणी येतात. तिथं इंचरनेट सेवाही सुरळीत नसते. पण, अशा वेळी गुगल मॅप्स मात्र तुमच्या मदतीला येऊ शकतं. Google Maps च्या ऑफलाईन मॅप्सच्या मदतीनं तुम्हाला इंटरनेट किंवा सेल्युलर नेटवर्कशिवायही ऑफलाईन GPS वापरता येऊ शकतं. असं करुन तुम्ही कोणत्याही लोकेशनचा मॅप अर्थात नकाशा हा स्मार्टफोनमध्ये आधीच डाऊनलोड किंवा सेव्ह करु शकता.
त्यासाठी खालील कृती करा...
- स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स हे ऍप सुरु करा.
- यानंतर अगदी वर डाव्या बाजुला दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाईलवर टॅप करा आणि 'ऑफलाईन मॅप्स' सिलेक्ट करा.
- यानंतर 'सिलेक्ट युवर मॅप' वर क्लिक करा आणि तुम्हाला जिथं जायचं आहे ते ठिकाण निवडा.
- पुढं मॅप डाऊनलोड होईल आणि तुम्ही ऑफलाइन असतानाही अगदी सहजपणे त्याची मदत घेऊ शकता.