तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?
देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती.
मुंबई : देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती. ही ४० अॅप सुरक्षा दलातील जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी वापरू नयेत, असे आदेशही गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत.
गुप्तचर यंत्रणांच्या यादीतल्या अॅपमध्ये ट्रूकॉलरचाही समावेश आहे. पण ट्रूकॉलरनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आमचं अॅप या यादीमध्ये का आलं याची आम्ही चौकशी करतोय. आम्ही कोणताही डेटा चोरत नाही तसंच आमचं अॅप परमिशन बेस्ड असल्याचं स्पष्टीकरण ट्रूकॉलरनं दिलं आहे.
शाओमीचंही स्पष्टीकरण
ट्रूकॉलरबरोबरच शाओमीनंही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ग्राहकांच्या सुरक्षेला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो, अशी प्रतिक्रिया शाओमीनं दिली. अनेक एंड्रॉइड आणि आयओएसमधील अॅप्स चीनच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनी तयार केली आहेत. तर काही अॅप्स चीनच्या कंपनीने तयार केली आहेत. या सगळ्या अॅप्सचे सॉफ्टवेअर किंवा मालवेअर धोकादायक असल्याचं सांगितलं जातं आहे. या अॅप्सद्वारे डेटा आणि अन्य माहिती हॅक केली जाऊ शकते. या अॅप्सची संख्या ही ४० पेक्षा अधिक सांगण्यात येत आहे.
ही आहेत ती ४० अॅप्स
वीबो, वीचॅट, शेअरइट, ट्रूकॉलर, यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर, ब्यूटी प्लस, न्यूजडोग, वीवा व्हिडिओ, क्यू व्हिडिओ, आयएनसी, पॅरालल स्पेस, अपुस ब्राऊजर, परफेक्ट कार्प, वायरलल क्लीनर हाई सिक्युरिटी लॅब, सीएम ब्राऊसर, एमआय कम्युनिटी, डयू रिकॉर्डर, वाल्ट हाइड, यूकॅम मेकअप, एमआय स्टोर, कॅचक्लीनर डयू एप्स, डयू बैटरी सेवर, डयू क्लीनर, डयू प्राइवसी, 360 सिक्युरिटी, डयू ब्राउसर, क्लीन मास्टर-चीता मोबाइल, बॅडू ट्रांसलेट, बॅडू एप, वंडर कॅमरा, ईएस फाइल एक्सप्लोरर, फोटो वंडर, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू म्यूजिक, क्यूक्यू मेल, क्यूक्यू प्लेयर, क्यूक्यू न्यूजफीड, क्यूक्यू सिक्युरिटी, सेल्फी सिटी, मेल मास्टर, एमआय व्हिडियो कॉल आणि क्यूक्यू लाँचर