मुंबई : ट्विटर वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरच्या नव्या निर्णयाच्या नियमांनुसार कुठलाही ट्विटर यूजर एका दिवसांत ४०० हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापूर्वी ही मर्यादा एक हजार एवढी होती. ट्विटरच्या सुरक्षा समूहाने यासंदर्भात ट्विट केले आहे. फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या हजार वरून ४०० इतकी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे यूझर्सना कुठलाही त्रास होणार नसल्याचे ट्विटरने म्हटले आहे. बॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोगॅमद्वारे काही वेळा ट्विटर अकाऊंटस चालवली जातात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात खऱ्या अकाऊंटना फॉलो केले जाते. त्यामुळे या बॉट अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या वाढते. अशा अकाऊंटवरून ट्विट किंवा संदेशाच्या स्वरुपात अनेक लिंक किंवा मार्केटिंगचा मजकूर पाठवला जातो. असे स्पॅम रोखण्यासाठी ट्विटरने नियमांत हे नवे बदल केले आहेत.


दुसरीकडे ट्विटरने लोकसभा निवडणूक २०१९ च्या उद्देशाने भारतासाठी जाहिरात पारदर्शकता केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. यामुळे लोक देशातील राजकीय जाहिरातींची माहिती पाहू शकतात. राजकीय जाहिरातींसाठी नियम कडक करून ट्विटरवर पारदर्शकता आणण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.


गेल्या वर्षी ट्विटरने 'बल्क ट्विटींग'वरही बंदी घातली होती. त्यामुळे यूजर वेगवेगळ्या अकाऊंटवरून एकच ट्विट करू शकत नाही. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात ट्विटरने बनावट आणि संशयास्पद असलेल्या अकाऊंटवर रिपोर्ट करण्यासाठी यूजर्सला काही विशेषाधिकार दिले होते. त्या अधिकारांमुळे यूजर बनावट अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलेल्या पोस्ट चिन्हांकीत करू शकतात. गेल्या वर्षी ट्विटरने सात कोटी बनावट अकाऊंट ट्विटरवरून काढून टाकली होती. हे सर्व बदल स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केले असल्याचे ट्विटरकडून सागंण्यात आले आहे.