`ब्लू व्हेल चॅलेंज`... ऑनलाईन मृत्यूचं सावट!
मोबाईल ही खर तर संवाद साधण्याची गोष्ट पण याच मोबाईलमधील वेगवेगळे गेम आता वेळेचा सदुपयोग ठरण्यापेक्षा काळाला निमंत्रण देणारे ठरत आहेत. पोकेमॅनच्या जाळ्यातून थोडं बाजूला गेलेल्या तरुणाईला आपला जाळ्यात ओढणारा नवा गेम पुन्हा ऑनलाईन मृत्यूचा खेळ खेळतोय. ब्लू व्हेल चॅलेंज नावाच्या या खेळाने आतापर्यंत २५० जणांचा जीव घेतलाय.
अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : मोबाईल ही खर तर संवाद साधण्याची गोष्ट पण याच मोबाईलमधील वेगवेगळे गेम आता वेळेचा सदुपयोग ठरण्यापेक्षा काळाला निमंत्रण देणारे ठरत आहेत. पोकेमॅनच्या जाळ्यातून थोडं बाजूला गेलेल्या तरुणाईला आपला जाळ्यात ओढणारा नवा गेम पुन्हा ऑनलाईन मृत्यूचा खेळ खेळतोय. ब्लू व्हेल चॅलेंज नावाच्या या खेळाने आतापर्यंत २५० जणांचा जीव घेतलाय.
आता कदाचित तुम्हीही मोबाईलवर अपडेट चेक करत असाल, पण तुम्हाला हे ठाऊक नाही की तुमच्या हातातील याच मोबाईलच्या एका गेमने एक दोन नाही तर तब्बल २५० जणांचा जीव घेतलाय... आणि या जिवघेण्या ऑनलाईन गेमचे नाव आहे... ब्लू व्हेल चॅलेंज...
मुलांना एकटं करणारा गेम
एक ऑनलाईन गेम ज्यानी अवघ्या जगात धुमाकूळ घातलाय. पण हे कुठेतरी दुर सुरु आहे असं जर वाटत असेल तर तो केवळ तुमचा गैरसमज आहे.. कारण हा मृत्युचा खेळ तुमच्या शहरात चोरपावलांनी केव्हाच दाखल झालाय.. आणि याच उत्तर नसलेल्या संकटात सापडले आहेत मुंबईचे निकुंज शर्मा.. कायम हसणारी खेळणारी त्यांची पाचवीत शिकणारी मुलगी रेनिका अचानक एकटी राहू लागली आणि कारणाचा शोध घेताना समजलं ते ब्लू व्हेल चॅलेंजचं धक्कादायक वास्तव... ही अवस्था केवळ निकुंज यांची नाही तर अशा असंख्य पालकांची आहे. ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम दिवसेंदिवस प्रत्येकाची डोकेदुखी बनत चाललाय.
२५० जणांनी गमावलाय जीव
- २०१३ साली रशियात शोधण्यात आलेला ब्लू व्हेल चॅलेंज हा ऑनलाईन गेम आहे.
- मानसशास्त्राचा विद्यार्थी फिलीप्स बुडिकीन यांने हा खेळ शोधल्याचा दावा केला होता. हा खेळ सुरु झाल्यावर २०१६ मध्ये १६ तरुणींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन फिलीप्स याला अटक करण्यात आली.
- या खेळाचा विखार एवढा वाढला की, रशियात १३० बालकांचा मृत्यूही झाला होता. या खेळात जगभरातल्या २५० जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
सकाळी ४.२० वाजता सुरु होतो खेळ...
- प्ले स्टोरमधून गेम डाऊनलो़ड केल्यानंत दररोज पन्नास चॅलेंजेस पूर्ण करावी लागतात. सुरुवातीला सोप्पी आव्हानं, नंतर नंतर जीवघेणी आव्हानं बनत जातात.
- कधी सकाळी साडेचार वाजता उठा तर कधी, हातावर ब्लेडने खुणा करा... किंवा दिवसभर सुईने स्वत:ला टोचा किंवा पुलाच्या टोकावर जाऊन उभे रहा असे जिवघेणे टास्क पूर्ण करावे लागतात.
- हा खेळ वास्तविकपणे मुलांना एकाकी बनवून त्यांना मोहीत करतो. अजूनपर्यंत भारतात या खेळाचे बळी नसले तरी दिवसभर ऑनलाईन असणाऱ्या भारतीय समाज फार काळ या खेळापासून दूर राहू शकत नसल्याची भीती मनोचिकित्सक डॉ. युसूफ माचिसवाला यांनी व्यक्त केलीय.
या खेळात पहाटे चार वाजून वीस मिनीटांनी पहिला मेसेज येतो.. आणि त्यानंतर प्रत्येक चॅलेंज पूर्ण केल्यानंतर सेल्फी अपलोड केल्यानंतर पुढच्या स्टेजला प्रवेश मिळतो. हा गेम केवळ ऑनलाईन असून यामध्ये सतत अपग्रेडेशन होत राहते. दररोज पहाटे सुरु होणारा खेळ जर वेळीच थांबवला नाही तर अनेकांच्या आय़ुष्यात कदाचित दिवस उगवतीलाच मावळतील हाच असेल झी मीडियाचा सावधानतेचा इशारा...