नवी दिल्ली - देशातील स्मार्टफोनधारकांकडून ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो, अशा व्हॉट्सऍपने सातत्याने ग्राहकांसाठी नवनवीन फिचर आणले आहेत. त्यातही व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांना ज्याचा सर्वाधिक त्रास होतो, त्यावरही कंपनीकडून विचार केला जात असून, त्यामध्ये बदल करण्यात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सऍपने मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंधने घातली होती. आता व्हॉट्सऍप लवकरच आणखी एक फिचर आणणार आहे. ज्यामध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये कोणालाही थेट समाविष्ट करून घेता येणार नाही. संबंधित व्यक्तीने संमती दिल्यानंतरच तिचा व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये समावेश होऊ शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सऍपकडून सध्या या फिचरवर काम करण्यात येत आहे. यामुळे कोणताही ग्रुप तयार केल्यानंतर त्याचा ऍडमिन सांभाळणारी व्यक्ती सरसकट त्याच्यामध्ये कोणालाही समाविष्ट करू शकणार नाही. ज्याला ग्रुपमध्ये घ्यायचे आहे. त्याला व्हॉट्सऍपकडून एक संदेश जाईल. जर तो त्याने स्वीकारला तरच त्या व्यक्तीचा संबंधित ग्रुपमध्ये समावेश होईल. जर त्या व्यक्तीने व्हॉट्सऍपवर आलेला संदेश नाकारला, तर त्याला संबंधित ग्रुपमध्ये समाविष्ट करता येणार नाही. व्हॉट्सऍपच्या या नव्या फिचरमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक जण वेगवेगळे ग्रुप तयार करतात आणि त्यामध्ये न विचारता कोणालाही समाविष्ट केले जाते. व्हॉट्सऍप ग्रुप आपल्या उपयोगाचा नसल्यावर अनेक लोक त्यातून बाहेर पडतात. आता या सगळ्यावर बंधने येणार आहेत.


या फिचरचा उपयोग करण्यासाठी ग्राहकांना  Settings > Account > Privacy > Groups यामध्ये जावे लागेल. ग्रुप्समध्ये तीन पर्याय उपलब्ध होतील. ग्रुपमध्ये कोण समाविष्ट करू शकेल, या आधारावर ते पर्याय उपलब्ध असतील. ग्राहकांना यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.


पर्याय १ कोणीही - हा पर्याय निवडल्यास कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. तुमचा मोबाईल क्रमांक संबंधित व्यक्तीकडे सेव्ह असल्यास तो तुम्हाला त्याने तयार केलेल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल.


पर्याय २ माझे कॉन्टॅक्ट - आपल्या मोबाईलमध्ये ज्यांचे मोबाईल क्रमांक सेव्ह आहेत. तेच आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकतात. जर आपल्या मोबाईलमध्ये त्यांना क्रमांक सेव्ह नसेल, तर आपल्याला एक मेसेज येईल आणि तो स्वीकारल्यानंतरच आपण त्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ.


पर्याय ३ कोणीही नाही - जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल, तर थेटपणे कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकणार नाही. प्रत्येकवेळी एक मेसेज तुम्हाला येईल आणि तो तुम्ही स्वीकारला तरच तुम्ही त्या ग्रुपमध्ये समाविष्ट व्हाल अन्यथा नाही.