`WhatsApp`ने आणले नवे फिचर, ग्रुप चॅटींग होणार आणखी मजेशीर
जगभरातील वापरकर्त्यांची संख्या विचारात घेऊन व्हॉट्सपही सतत नवनवी फिचर्स घेऊन येत असते.
मुंबई: फेसबुकचा मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅपने सोशल मीडियात एक स्वत:ची अशी एक खास जागा निर्माण केली आहे. जगभरातील वापरकर्त्यांची संख्या विचारात घेऊन व्हॉट्सपही सतत नवनवी फिचर्स घेऊन येत असते. आताही व्हॉट्सअॅप असेच मजेशीर फिचर घेऊन यूजर्सच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे ग्रुप चॅटींग आणखी मजेशीर होईल.
नवे फिचर्स अनेकांसाठी फायदेशीर
कंपनीने एका अधिकृत ब्लॉगवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'व्हॉट्सअॅप वापराच्या अनुभवाबाबत बोलायचे तर, ग्रुप चॅट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जगभरात विविध ठिकाणी असलेले फॅमेली मेंबर्स असोत की, बालपणीचे दोस्त, सर्वांसाठीच व्हॉट्सअॅप अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपसारख्या सपोर्टच्या शोधात असलेले पालक, ग्रुप स्टडी करू इच्छिणारे विद्यार्थी, विविध क्षेत्रात काम करणारे लोक ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. आज आम्ही असे काही फिचर्स घेऊन येत आहोत जे खास करून ग्रुपसाठीच तयार करण्यात आले आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत अत्यंत महत्तवाचे फिचर्स
व्हॉट्सअॅपने ग्रुपसाठी ५ नवे फिचर्स दिले आहेत. ज्यात ग्रुप डिस्क्रिप्शन, एडमिन कंट्रोल, ग्रुप कॅच अप, पार्टिसिपेंट सर्च आणि एडमिन परमिशन आदींचा समावेश आहे. नव्या फिचर्सनुसार, युजर्सजवळ आता ग्रुप कायमचा सोडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे एखादा ग्रुप सोडला तर, त्यात वारंवार अॅड केल्या जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. तसेच, ज्या युजरने ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमधून हटवता येणार नाही. नव्या अपडेटनंतर यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने मेसेज पाहू शकेल. ज्या ग्रुपमध्ये त्याला मेन्शन करण्यात आले आहे.
दरम्यान, व्हॉट्सअॅपने आपल्या बिझनेस अॅपमध्येही एक नवे फिचर समाविष्ठ केल्याची बातमी मध्यंतरी आली होती. व्हॉट्सप लवकरच 'चॅट फिल्टर' फिचरही उपलब्ध करून देण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.