व्हॉट्सअॅपचं हे फिचर देणार अफवा पसरवणाऱ्यांना दणका
सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे होणारं नुकसान केवढं घातक ठरू शकतं हे नुकत्याच झालेल्या भारत बंदमध्ये दिसून आलं होतं.
मुंबई : सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे होणारं नुकसान केवढं घातक ठरू शकतं हे नुकत्याच झालेल्या भारत बंदमध्ये दिसून आलं होतं. पण अशा अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फिचर येणार आहे. व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणाऱ्या अशा अफवांचे मेसेज थांबवणारं फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे. जर एखादा मेसेज २५ पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल तर या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे हे लगेच पकडता येईल, असं व्हॉट्सअॅपनं सांगितलं आहे. हे फिचर फक्त मोबाईलवर येणारे मेसेज रोखणार नाही तर मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे.
व्हॉट्सअॅपवर मिळणार इशारा
एखादा मेसेज जास्त जणांना पाठवला तर त्याची ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. तसंच अनेकांना एकच मेसेज पाठवला तर फॉरवर्डेड मेनी टाईम्स असा मेसेज येईल. एवढच नाही तर संशयास्पद मेसेज फॉरवर्ड करताना व्हॉट्सअॅपकडून इशाराही देण्यात येईल. तसंच तुम्ही पाठवलेला मेसेज अनेक जणांना फॉरवर्ड झाला आहे, अशी सूचनाही व्हॉट्सअॅपवर येणार आहे.
का पडली गरज?
भारत बंदच्यावेळी पसरलेल्या अफवांमुळे देशभरात हिंसाचार पाहायला मिळाला. यानंतर आणखी हिंसाचार टाळण्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थानमधल्या प्रभावित भागामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. नोटबंदीवेळी २ हजार रुपयांच्या नोटेमध्ये चीप असल्याची अफवाही पसरवण्यात आली होती. एप्रिलमध्ये दिल्लीत मोठा भूकंप होऊन मोठं नुकसान होईल, अशी अफवाही पसरवण्यात आली होती.