मुंबई : आजचा दिवस त्या महिलांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. ज्या छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नालिजम) करित आहेत. अगदी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगललाही आजच्या दिवसाचे महत्त्व माहिती आहे. म्हणूनच डूडलच्या माध्यमातून गुगलने होमी व्यारवाला यांच्या आठवणी जागवल्या आहेत. होमी व्यारवाला या भारतातील पहिल्या छायाचित्र पत्रकार (फोटो जर्नालिस्ट) होत्या.


पत्रकारितेतील मैलाचा दगड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होमी व्यारवाला यांचा जन्म 13 डिसेंबर 1913ला तर, मृत्यू जानेवारी 2012मध्ये झाला. मृत्यू समयी त्या 98 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथील पारसी कुटूंबात झाला. त्यांचे वडील उर्दू थियेटरमध्ये अभिनेता होते. महिला फोटो पत्रकार म्हणून आपले करिअर करणाऱ्या होमी व्यारवाला यांची आज 104वी जयंती आहे. व्यारवाला यांचे कार्य हे पत्रकारितेतील मैलाचा दगड आहे. याचे कारण त्यांनी ज्या काळात पत्रकारिता विशेषत: छायाचित्र पत्रकारिता सुरू केली तो काळ पारतंत्र्याचा तर होताच. पण, सामाजिक बंधने इतकी घट्ट होती की, पत्रकारिताच नव्हे तर, इतर कोणत्याही क्षेत्रात महिलांनी काम करणे हे केवळ कठीणच नव्हे तर, अशक्य कोटीतील बाब होती.


व्यारवाला आणि मुंबई एक अतूनट नाते


भारतातील पहिला छायाचित्र पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमी व्यारवाला यांचे मुंबईशी खास घनिष्ठ नाते होते. कारण, त्यांची छायाचित्रकलेचे शिक्षण आणि जडणघडण मुंबईत झाली. मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी आपले शिक्षण घेतले. रॉलिफ्लेक्स हा त्यांचा आवडता कॅमेरा होता. 1930 ते 1970 या काळात त्यांच्या पत्रकारितेचा बहराचा काळ होता. त्यांनी आपल्या एकूण पत्रकारितेत 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' छायाचित्रे काढण्यास प्राधान्य दिले.


1947चे दुर्मिळ आणि तितकेच महत्त्वाचे क्षण कॅमेऱ्यात कैद


1947 हे साल समग्र भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे. इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडून भारत स्वतंत्र झाला. हा आनंद देशभरात साजरा करण्यात आला. या क्षणाचे ऐतिहासिक क्षण व्यारवालांच्या चौकस नजरेतून आणि कॅमेऱ्यातून सुटले असते तरच नवल. हे दुर्मिळ आणि तितकेच महत्त्वाचे क्षण व्यारवालांनी अचूक टीपले आहेत. बॉम्बे क्रॉनिकलमध्ये त्यांची छायाचित्रे पहिल्यांदा प्रकाशित झाली. विशेष असे की, या छायाचित्रांचे त्यांना प्रत्येकी एक रूपया इतके मानधन मिळत असे. आपल्या पतीसोबत दिल्लीला आलेल्या व्यारवाला यांनी ब्रिटीश सूचना सेवा कर्मचाऱ्याच्या रूपात भारतीय स्वातंत्र्याचे ते क्षण टीपले.


1970मध्ये छायाचित्रकारितेला अलविदा


तब्बल 40 वर्षे अथक पत्रकारिता करणाऱ्या या अवलिया महिला पत्रकाराने 1970मध्ये आपल्या छायाचित्रकारितेला अलविदा म्हटले. 1970  मध्ये त्यांच्या पतींचे निधन झाले. या धक्क्यातून सावरताना त्या छायाचित्रकारितेतून बाजूला झाल्या. 2011मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण पूरस्काराने सन्मानित केले.