ऊसाच्या रसावर धावणारी कार! पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, गडकरींचा दावा; आज होणार लॉन्च
World Flex Fuel Vehicle: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या गाडीचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. जाणून घ्या या इंधनामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे याच्याकडे भविष्यातील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.
World Flex Fuel Vehicle: केंद्रीय परिवहन मंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहेत. ही कार पूर्णपणे इथेनॉलवर चालू शकते. गडकरी आज टोयोटा इनोव्हाचं फ्लेक्स फ्लूअल मॉडेल लॉन्च करणार आहे. इथेनॉलची खास गोष्ट अशी ही हे इंधन तेलापासून तयार केलं जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या ऊसापासून हे बनवलं जातं. तसेच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा कमी प्रदूषण होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असाही दावा केला होता की इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचं प्रमाण वाढल्यानंतर देशातील पेट्रोलचे दर 15 रुपये लीटरपर्यंत खाली येतील.
भारत सरकारची योजना काय?
भारत सरकार सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना तयार करत आहे. E20 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत 2025-2026 पर्यंत देशभरामध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल लॉन्च केलं जाईल. भारत सरकारने 2021-22 च्या आपल्या ऊर्जेसंदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी 86 टक्के इंधन आयात केलं होतं. 11 जुलै 2023 मध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी, "E20 पेट्रोल सध्या 1,350 पेट्रोल पंपांवर मिळत आहे. 2025 पर्यंत ते दशभरामध्ये उपलब्ध होईल," असं म्हटलं होतं.
इथेनॉल नेमकं असतं तरी काय?
इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. इथेनॉल हा ऊसापासून तयार करण्यात येणारा एक बायप्रोडक्ट आहे. याची निर्मिती ऊसाचा रस, मका, बटाटा, कंदमुळं आणि खराब झालेल्या भाज्यांपासून केली जाते. स्टार्च आणि साखर यांचं विघटन होऊन तयार झालेलं इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून बायोफ्युअल किंवा फ्लेक्स फ्लुअल म्हणून इंधन वापरलं जातं. इथेनॉल मिसळून तयार करण्यात आलेलं फ्लेक्स फ्लुअल पेट्रोल पंपांवर पाठवलं जातं. फ्लेक्स फ्लुअलने चालणारी वाहनं ही वेगळ्या पद्धतीची असतात. या वाहनांचे इंजिन अशापद्धतीने तयार करण्यात आलेलं असतं की त्यामध्ये फ्लेक्स फ्लुअल वापरल्यास काही अडचण येत नाही.
सर्वाधिक इथेनॉल वापरणार देश कोणता?
ब्राझील हा जगातील सर्वाधिक फ्लेक्स फ्लुअलचं उत्पादन करतो. 1975 साली ब्राजीलने तेल उत्पादनांसंदर्भात स्वत:ला आत्मनिर्भर बनवण्यासाठी इथेनॉलचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. आज ब्राझीलमधील 93 टक्के गाड्या इथेनॉल मिश्रित फ्लेक्स फ्लुअलवर चालतात. 2030 पर्यंत ब्राझील आपल्या इंधनाच्या मागणीपैकी 72 टक्के वाटा हा जैविक इंधनामधून पूर्ण करण्याचा मानस आहे.
इंधनाचे दर होतील कमी
फ्लेक्स फ्लुअलवर चालणाऱ्या गाड्या पेट्रोल, डिझेल आणि इथेनॉलपैकी कशावरही चालतात. नितीन गडकरी आज जी कार भारतात लॉन्च करत आहेत ती 100 टक्के इथेनॉलवर चालण्याची क्षमता असलेली गाडी आहे. म्हणजेच फ्लेक्स फ्लुअलबरोबरच फक्त इथेनॉल वापरुनही ही गाडी चालू शकते. फ्लेक्स फ्लुअलच्या गाड्यांची संख्या वाढली तर पदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचं प्रमाण कमी करता येईल. यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवता येईल. तसेच इंधनाचे दरही कमी होती. काही महिन्यांपूर्वी गडकरींनी पेट्रोलचे दर 15 रुपये लीटरपर्यंत उतरतील असं फ्लेक्स फ्युएलचा वापर वाढल्यास काय होईल याबद्दलच्या भाषणामध्ये म्हटलं होतं.
शेतकऱ्यांनाही होणार फायदा
इथेनॉलची किंमत पेट्रोलियम पदार्थांपेक्षा कमी आहे. एका लीटर पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यास त्या पेट्रोलची किंमत नक्कीच कमी होईल. इथेनॉलवर पेट्रोलपेक्षा कमी कर आकारला जातो. याच कारणामुळे फ्लेक्स फ्लुअल हे पेट्रोलियम प्रोडक्टपेक्षा स्वस्त असतं. फ्लेक्स फ्लुअल वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साइट आणि मोनोऑक्साइडसारख्या गॅसचं कमी प्रमाणात उत्सरुज्न होतं. म्हणजेच प्रदुषाणाचं प्रमाण कमी होतं. शेती उत्पादनांवर हे इंधन आधारित असल्याने याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल असं मानलं जात आहे.