शाओमी लॉन्च करणार जगातील पहिला डबल फोल्डेबल स्मार्टफोन
सॅमसंग आणि हुवावे कंपनीचे फोल्डेबल स्मार्टफोन महाग आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी सॅमसंग आणि हुवावे कंपनीकडून फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीही लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. शाओमी जून महिन्यापर्यंत हा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंग आणि हुवावे कंपनीचे फोल्डेबल स्मार्टफोन महाग आहेत. शाओमीने कमी किंमतीत अधिकाधिक फिचरची स्ट्रॅटेजी वापरत बाजारात आपली ओळख बनवली आहे. शाओमीचा स्मार्टफोन सॅमसंगच्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत १.४ लाख रूपयांपासून सुरू आहे. तर हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत जवळपास १.८ लाख रूपये इतकी आहे. शाओमीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच जवळपास ७०००० रूपयांपर्यंत असणार आहे. मे आणि जून महिन्यापर्यंत शाओमीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला संपूर्ण ग्लोबल बाजारात उतरवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शाओमीचे व्हाईस प्रसिडेंट वांग शियांग यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये कंपनीचे को-फाऊंडर बिन लिन एक फोल्डेबल स्मार्टफोनचा वापर करताना दिसत आहेत. या व्हिडिओसह वांग शियांग यांनी हा जगातील पहिला डबल फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचे ट्विटही केले आहे.