शाओमी कंपनीने आणले प्रदूषणरोधक मास्क
या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे.
नवी दिल्ली : मानवी आरोग्यास हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात. तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. वायुप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी एमआय या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने वेगळे काही करण्याचा प्रयत्न केले आहेत. दिल्ली, मुंबईसह इतर शहरातील वायु प्रदूषणाचे प्रमाण बघून, चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक मास्कची विक्री MI.COM या वेबसाइटवर सुरु आहे. मास्कची किंमत २४९ रुपये आहे.
प्रदूषण रोधक मास्कचे फायदे
तंत्रज्ञान कंपनी एमआयचा दावा आहे की या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे. या प्रदूषणरोधक मास्कमध्ये ४ थर (लेयर) लावण्यात आले आहेत. मास्कच्या मदतीने हवेत मिसळणारे धूलीकण रोखून शुद्ध हवा मिळवता येईल. तसेच श्वास घेतानादेखील त्रास होणार नाही. कंपनीच्या माहितीनुसार मास्क अगदी मऊ आणि आरामदायक आहे. गरज नसल्यास याची रुमालासारखी घडी करुन ठेवता येईल.
दिल्लीमध्ये वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील स्थानिकांना प्रदूषणाचा सातत्याने सामना करावा लागतो. येथील हवा चारपटीने अधिक धोकादायक आहे. दिल्लीतील ३० भागांमध्ये हवा खूप धोकादायक आहे. हवा शुद्ध करणाऱ्या मास्कचे चीनमध्ये २०१६ला अनावरण करण्यात आले होते. यात हायफायबर टेक्स्टाइलचा वापर करण्यात आला होता.