ठाणे : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मैदानात उतरले असून राज्यातील विविध शहरांचा दौरा सुरु केला आहे. नाशिक आणि पुणे दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी आज ठाणे शहराचा दौरा केला. ठाणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी आज संवाद साधत त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.


'तिकिटासाठी प्रवेश नको'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केवळ तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात प्रवेश करू नका, असं राज ठाकरे यांनी खडसावून सांगितलं. ठाणे महानगरपालिकेत 130 विद्यमान नगरसेवक आहेत, तेवढेच वार्ड शाखाध्यक्ष मला पाहिजेत, जास्त वाढवत बसु नका, शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे असं सांगतानाच  एकमेकांशी हेवेदावे करू नका, एकमेकांशी जोडून राहा, मनसे पक्ष कसा बळकट होईल याचा विचार करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. 


प्रभाग अध्यक्ष पद रद्द करुन दुसरा पर्याय देणार असल्याच सांगत पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार असं सांगत राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचनाही केल्या. सोशल मीडियाचा वापर कमी करा असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.


'नुसते दौरे नको, मदत करा'


रायगड दुर्घटनेत नुसते दौरै करणे योग्य नाही, नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचणं गरजेचे आहे. वादळी वाऱ्याबाबत राज्यात काहीच नियोजन नाहीये असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी सरकारवर केला. पूरग्रस्त भागात ठीक ठिकणी माझा महाराष्ट्र सैनिक हा मदत करतोय, व्यवस्थित नियोजन नसल्याने अश्या दुर्घटना घडतायत, सगळ्यात आधी नियोजन करणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे,


ठाणे शहराची दुरवस्था झाली आहे


ठिकठिकाणी फक्त वस्त्या वाढत आहेत, लहान असताना मी ठाण्यात यायचो, तेव्हा टुमदार शहर अशी ठाण्याची ओळख होती. आज या ठाण्याची काय अवस्था झाली आहे? टाऊन प्लानिंग नाही, काहीच नाही, असं ते म्हणाले.


'काळजी करू नको'


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न यावेळी राज ठाकरेंना करण्यात आला. त्यावर, मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तू काळजी करू नको, असं ते म्हणाले.