चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत हवाहवासा वाटणारा जंगलचा राजा म्हणून ओळखली जाणारी डोंगरावरची काळी मैना बाजारात दाखल झाली आहे. गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेला बदलापूरच्या प्रसिद्ध जांभूळ बाजार उशिरा का होईना पाट्यांनी फुलू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूमध्ये राहणारे कयूम कल्लू खान यांच्या तीन पिढ्या ५० वर्षांपासून जांभळाचा व्यवसाय करत आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकाशेजारी एका जांभळाच्या झाडाखाली हा बाजार भरतो. कयूम खान हे हातावर फडके टाकून अनोख्या पद्धतीने लिलाव करतात. या बाजारात एरंजाड, सोनीवली, जांभळा या  बदलापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील आदिवासी जांभूळाच्या पाट्या घेऊन येतात, एका पाटीचा भाव चौदाशे ते पंधराशे रुपये इतका असतो. 


बदलापूरच्या प्रसिद्ध जांभूळ मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातो. हलवा, काला खट्टा, गिरवी अशा तीन प्रकारचे जांभूळ बाजारात असतात. मात्र   आकाराने मोठा आणि चवीला अत्यंत गोड असल्याने प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरच्या जांभळाला बाजारात प्रचंड मागणी आहे. यामध्ये, मात्र यंदा मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे या पिकावर परिणाम  झाला असून दिवसाला १५ ते २० पाट्या येतात. सध्या मुबईला बदलापूरच्या नावाने बाहेरची जांभळे विकली जात असल्याची खंत कयूम खान यांनी व्यक्त केली.


आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते. मात्र सध्या सुरु असलेली वृक्षतोड त्यामुळे जांभळाची झाडे कमी होत चालली असून आदिवासींच्या हक्काचा रोजगार जाण्याचा मार्गावर आहे.