डोंबिवली : नाताळ सणाच्या दिवशी अनेक कार्यालयांना असणारी सुट्टी पाहता मध्य रेल्वे मार्गावर येणाऱ्या ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचं काम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. परिणामी २५ डिसेंबरच्या दिवशी कल्याण- डोंबिवसी येथील जलद मार्गासह पाच आणि सहा क्रमांकांच्या मार्गिकेवरही विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्याच्या घडीला या स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून, एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही संतप्त प्रवाशांनी स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत तेथे गोंधळ घातल्याचंही पाहायला मिळत आहे. काही वर्ग वगळल्यास उर्वरित चाकरमानी वर्गाला या ब्लॉकचा फटका बसत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या कारभारामुळे प्रवासी पुन्हा बेजार झाले आहेत. 


बुधवारी सकाळी ९.४५ मिनिटांपासून ते दुपारी १.४५ मिनिटांपर्यंतच्या सुमारे चार तासांच्या य़ा ब्लॉकदरम्यानच्या कालावधीत ४०० मॅट्रिक टन वजनी ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर उभारण्यात येत आहेत. परिणामी कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इतकच नव्हे तर, लांब बल्ल्याच्या १६ गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे एकंदरच या परिस्थितीमुळे प्रवाशांना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे.



एकिक़डे गैरसोय, दुसरीकडे पर्यायी मार्ग 


रेल्वे मार्गावर घेण्यात येणारा ब्लॉक पाहता आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत विशेष बससेवा पुरवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत २० वाढीव बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. डोंबिवलीत असणाऱ्या बाजीप्रभू चौक येथून बस प्रवासाठी विशेष अधिकारी, पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळही बसथांबा ठेवण्यात आला आहे.