नवी दिल्ली: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्व घटकांना ध्यानात ठेवून तयार करण्यात आहे. या अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असे करता येईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील विविध घोषणांचा ओझरता आढावा घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतर घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय आहे. यापूर्वी अनेक सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या. मात्र, दोन ते तीन कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. परंतु, पंतप्रधान किसान योजनेमुळे देशातील तब्बल १२ कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशूपालन, गोपालन आणि मत्स्यपालन अशा पूरक उद्योगांना चालना देण्याचे काम या अर्थसंकल्पातून झाल्याचे मोदींनी म्हटले. 


तर पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणे, हे प्रामाणिक करदात्यांसाठी बक्षिस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. अखेर आमच्या सरकारने ती पूर्ण केली आहे. यामुळे काहीतरी करु इच्छिणाऱ्यांचा हुरुप वाढेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 


तर श्रमयोगी मानधन पेन्शन योजनादेखील देशातील असंघटित कामगारांच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचे वक्तव्य मोदी यांनी केले. आतापर्यंत असंघटित क्षेत्रातील लोकांचा कधीच विचार झाला नाही. ४० ते ४२ कोटी इतकी संख्या असूनही त्यांना नशीबाच्या भरवशावर सोडून देण्यात आले. मात्र, श्रमयोगी मानधन पेन्शन योजना त्यांना खूप आधार देईल. तसेच वृद्धापकाळात त्यांना पेन्शनची सोय झाल्याने फायदा होणार आहे. आजपर्यंत काही कारणाने मागे राहिलेल्या प्रत्येकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आमचे सरकार करत आहे. त्यासाठी आगामी दहा वर्षांचे भान ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. यासाठी मी अर्थमंत्री अरूण जेटली, पीयूष गोयल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, असे मोदी यांनी सांगितले.