आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या ताडोबा बफर भागात निमढेला गावातील एक थरारक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. निमढेला गावातील विठ्ठल- रूखमाई मंदिराच्या शेजारी वाघाचा (Tiger) बछडा दिसल्याने खळबळ उडाली होती. वर वाघ आणि छताखाली मंदिरातील भाविक अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मंदिरात आलेल्या भाविकांना अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता आले. मात्र इतक्या जवळून वाघ पाहिल्याने भाविकांची काही काळ घाबरगुंडी उडाली होती. काही वेळानंतर हा वाघ जंगलात दिसेनासा झाला. तोवर भाविकांनी श्वास धरला रोखून धरला होता. एका वन्यजीवप्रेमीने हा व्हिडीओ त्याच्या कॅमेरात कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि वन वैविध्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात एक ऑक्टोबर पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर पर्यटन खुले झाले आहे. मात्र बफर भागातही वाघांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याच बफर भागात चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे असलेल्या विठ्ठल- रुक्माई मंदिराच्या टीनाच्या छताच्या शेजारी वाघ आणि खाली भाविकांची पूजा अर्चना असा प्रकार बघायला मिळाला.


या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र इथे कधीही वाघ- मानव संघर्ष बघायला मिळालेला नाही. पण छोटा मटका नावाचा वाघाचा बछडा या ठिकाणी सतत वास्तव्याला असतो. मंदिरात भाविक असताना छोटा मटका वाघ पत्राच्या शेजारी उभा होता. दुसरीकडे खाली मंदिरात भाविक आरती करत होते. मंदिराच्या वर वाघ पाहून भाविकांची चांगलीच तंतरली होती. त्याचवेळी बंडा अरविंद नावाच्या वन्यजीवप्रेमीने हे दृश्य कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर टाकले आहे. आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 



भाईंदरच्या उत्तन परिसरात बिबट्याचा वावर


भाईंदर पश्चिमेच्या उत्तन गावातील पालखाडी परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या वावर करत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी या बिबट्याची सीसीटीव्ही दृश्य संजय गांधी उद्यानात पाठवली असून त्याला रेस्कीयू करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी वन विभागामार्फत आता या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी देखील अनेक वेळा उत्तन परिसरात बिबट्याचा वावर अनेकवेळा दिसून आला आहे.