अकोला : राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला फटका बसला होता. उत्पादन कमी झाल्याने यंदा कपाशीचे भाव वाढले आहेत. अकोला जिल्ह्यात गुरूवारी कपाशीला कमाल 8725 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटलेल्या उत्पादनामुळे जळगाव, यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये कपाशीचे भाव वाढले आहेत. काल (गुरूवारी) अकोला जिल्ह्यात कपाशीला सर्वाधिक 8725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 


मुर्तिजापूर तालुक्यात कपाशीला 8600 रुपये प्रति क्विंटल भाव तर अकोट तालूक्यात 8600 ते 8725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बार्शीटाकली तालूक्यात कपाशीला 8200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.


बोरगाव मंजूमध्ये 8500 प्रति क्विंटल भाव मिळाला. परंतु पातूर, बालापूरमध्ये कपाशीला कमी भाव मिळाल्याचे दिसून आले. पातूरमध्ये 5800 रुपये प्रति क्विंटल भाव तर बालापूरमध्ये 5400 ते 5700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. 


जिह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी विक्रीसाठी आणावी असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.


कपाशीच्या यंदाच्या हंगामात पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले होते. अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाला फटका बसला. 


वेगवेगळे रोग आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कपाशीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेल्या कपाशीला सध्या चांगला भाव मिळत आहे.