Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील `या` 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?
Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान सोमवारी 13 मे 2024 रोजी सुरु झालं आणि राज्यातील या निमित्तानं सज्ज असणाऱ्या मतदान केंद्रांवर कमालीची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. काही मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली.
एकिकडे राज्यातील चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारी 14 गावं एका अतीव रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरली. कारण, ही गावं, येथील नागरिक फक्त महाराष्ट्रच नव्हे, आणखी एका राज्याच्या निवडणुकीसाठीसुद्धा मतदानाचा हक्क बजावतात. (Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting)
14 गावांचं दोन राज्यांसाठी मतदान
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याशी वाद सुरू असलेल्या 14 गावांमध्ये सोमवारी (13 मे रोजी) पुन्हा मतदान झालं. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी चौथ्या टप्प्यात स्थानिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील नागरिक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका असल्या की प्रत्येक वेळी मतदान करतात.
या गावांमध्ये सुरु असणारं हे दुहेरी मतदान टाळण्यासाठी यंदा दोन्ही राज्यातील प्रशासनाचे प्रयत्न होते. मात्र दोन्ही राज्यातील मतदार यादीत स्थानिकांची नावं असल्या कारणानं इथं सर्रास मतदान करण्यात आलं. सध्या हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही आणि शासन योग्य सोयी सुविधा देत नाही तोवर आम्ही मतदान करू असाच दावा येथील स्थानिक करताना दिसत आहेत.
चौथ्या टप्प्यात मोठ्या लढती
देशभरात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांनंतर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये देशातील 96 मतदारसंघांसाठीही मतदान होत आहे. अनेक मोठ्या लढती या टप्प्यात असल्यामुळं मतदारांचाही उत्साह शिगेला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. .
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : राज्यात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील, निलेश लंके, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, संदीपान भुमरे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, रक्षा खडसे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागल्यामुळं आता मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.