Corona in India | कोरोना प्रतिबंधाच्या जबाबदारीबाबत नितिन गडकरी यांची मोठी प्रतिक्रिया
कोरोना संकटात पीएमओ कामाचे नसून नितिन गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी भाजप खासदाराने म्हटले होते. गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून लावला जात आहे. त्यातच भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. कोरोना संकटात पीएमओ कामाचे नसून नितिन गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी असे त्यांनी म्हटले होते. गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वर्ध्यात जेनेटिक लाइफ सायंन्सेसमधील एक बैठकीदरम्यान, नितिन गडकरी यांना पत्रकारांनी सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या मागणीबाबत प्रश्न विचारला. यावर गडकरी म्हणाले की,' मी कोणतेही उत्कृष्ठ काम वेगैरे केलेले नाही. समाजात माझ्यापेक्षा उत्तम योगदान देणारे लोकं आहेत. आपले पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाऊंडर, पॅरामेडिकल स्टाफ आणि सरकारी कर्मचारी ही दिवसरात्र काम करीत आहेत. सध्या सर्वांनी जाती, धर्म, भाषा पक्षांमधील भेद मध्ये न आणता मानवतेच्या आधारावर सेवा करणं गरजेचं आहे. मीही त्यात यशाशक्ती योगदान देत आहे'.
काय म्हटले होते सुब्रमण्यम स्वामी?
देशात कोरोना संसर्गामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्य सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय हे कोरोना स्थिती हातळण्यात अपयशी असून हे काम युद्धपातळीवर करण्यासाठी मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असं भाजप खासदारानेच म्हटलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजनांचं काम नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.
'केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे खुपच नम्र असून त्यांच्या खात्याचं काम त्यांना मोकळेपणाने करू दिलं जात नाही. ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवाद्यानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना व्हायरसचा सामाना करून नक्कीच टिकू शकू. परंतु आपण आता ही परिस्थिती गंभीर्यांने घेतली नाही तर, आणखी एक कोरोना लाट येईल आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करेन, त्यामुळे पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे नाही. कोरोनाविरूद्धच्या युद्धाची जबाबदारी नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावी' असं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं.
कोरोना विरूद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वतःला सिद्ध केलं आहे. असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या पोस्ट नंतर ट्वीटवर नितिन गडकरी यांच्याकडे आरोग्य विभाग द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.