उन्हाळ्याची सुट्टी जीवावर बेतली; तीन मुलांचा भयानक मृत्यू
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं फिरायला जाण्याचा बेत आखत असतात. मात्र तलाव अथवा अपघात होवून जीवाला धोका निर्माण होवू शकतो अशा ठिकाणी पालकांनी मुलांच्या सोबत जावे. मुलांना एकटे सोडू नये.
Yawatmal News : सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. यामुळे मुले अनेक योजना आखत आहेत. मात्र, हीच उन्हाळ्याची सुट्टी जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. यवतमाळमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. तलावात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणांनी मित्रांसह पोहायला जायचा प्लान केला होता. मात्र, तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण चार मुलांचा मृत्यू झाला आहे.
यवतमाळ लगत असलेल्या दोन तलावांमध्ये तीन युवक बुडाले आहेत. पैकी दोघांचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे. रात्री उशीरा पर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात होता.
शाळकरी मुलगा तलावाच बुडाला
पहिल्या घटनेत टाकळी येथील तलावावर पोहायला गेलेला करण रामगडे हा 14 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला आहे. त्याच्या सोबत आणखी 3 विद्यार्थी होते. ते जिल्हा परिषद शाळेतील सातवीचे विद्यार्थी होते. उन्हाळी सुट्टी असल्याने ते टाकळी तलावावर पोहायला गेले होते. त्यापैकी करण हा बराचवेळ होऊन तो बाहेर न आल्यामुळे त्याचे मित्र भयभित झाले.त्याचा शोध घेतला असता थोड्या वेळाने त्याचा मृतदेहच हाती लागला. पोलिसांनी त्याचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
सहलीला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले
दुसऱ्या घटनेत किटा-कापरा येथील तलावावर दहा ते बारा महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. यावेळी ते पोहायला तलावात उतरले परंतु त्यातील काहींना पोहणे येत नसतानाही ते पाण्यात उतरले. यावेळी पाण्यातील गाळात ऋषभ बजाज याचा पाय रुतला. सुजय काळे हा देखील त्याच्यासोबत चिखलात फसला आणि दोघेही पाण्याच्या प्रवाहात बुडाले. त्यांचा मित्रांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळाले नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या पथकाने बोटी द्वारे शोधकार्य सुरू केले. यात 20 वर्षीय ऋषभचा मृतदेह हाती लागला असून सुजयचा शोध सूरु आहे. पोहायला आलेले सर्व युवक शासकीय तंत्रनिकेतन चे विद्यार्थी होते पैकी अनेकजण वसतिगृहात वास्तव्याला होते.