नागपूर: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ होताना पाहायला मिळाली. राज्यभरात तुकाराम मुंढे यांची कडक शिस्तीचे आणि सचोटीने नियम पाळणारा अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे मुंढे यांच्या हाताखालील अधिकारी वर्ग नेहमीच सतर्क असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर महापालिकेतही गुरुवारी त्याचे प्रत्यंतर आले. तुकाराम मुंढे पदभार स्वीकारायला येत असल्याच्या नुसत्या चर्चेनेच महापालिकेत मोठी धावपळ पाहायला मिळाली. सकाळीच मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाची घासून पुसून स्वच्छता करण्यात आली. 


मुंबई मेट्रोच्या संचालक पदावरुन अश्विनी भिडेंची बदली


तर कर्मचाऱ्यांसाठी दहाची कार्यालयीन वेळ असताना अनेक कर्मचारी धावत पळत कार्यालयात पोहोचताना दिसले. कोणाला वेळेत कार्यालयाच्या दारावर पोहोचण्याची घाई होती, तर कोणाला वेळेच्या आत पंचिंग करण्याची घाई असल्याचे दिसले. अनेकजण तर रिक्षाने कार्यालयात येताना दिसले. काहींना तर एवढी घाई झाली होती की एरवी आरामात कार्यालय बाहेर उभे राहून धूम्रपान केल्यानंतर कार्यालयात जाणारे आणि आरामात काम सुरू करणारे आज धावतपळतच सिगारेट ओढत कार्यालयाकडे पळताना दिसले. एकूणच मुंढे यांच्या नुसत्या आगमनानेच नागपूर महानगरपालिकेला शिस्त लागल्याचे तुर्तास दिसत आहे. 



देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची नियुक्ती नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेत केली होती. नवी मुंबईत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी चांगलेच हैराण केले होते. यानंतर मुंढे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एडस् नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. मात्र, आता ठाकरे सरकारने त्यांना नागपूर महानगरपालिकेत पाठवून भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे.