मुंबई मेट्रोच्या संचालक पदावरुन अश्विनी भिडेंची बदली

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.

Updated: Jan 21, 2020, 08:45 PM IST
मुंबई मेट्रोच्या संचालक पदावरुन अश्विनी भिडेंची बदली

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागी रणजीतसिंग देओल यांची भिडे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये संघर्ष झाला होता. अश्विनी भिडे यांची बदली झाली असली तरी त्यांना सध्या पोस्टिंग देण्यात आलेलं नाही.

राज्यामध्ये महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अश्विनी भिडे यांना सचिव पदावरून प्रधान सचिव पदी बढती देण्यात आली होती. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती. या वृक्षतोडीला शिवसेनेसह पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कुलाबा ते सीप्झ या मार्गावर धावणाऱ्या 'मेट्रो ३' प्रकल्पाला विरोध वाढत असतानाही अश्विनी भिडे यांनी कारशेडचा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 'आरे' भागात रात्रीच झाडे कापण्यात आल्यानंतर आंदोलकांसहीत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. तसंच सरकार आल्यानंतर झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करु, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, अश्विनी भिडेंनी अनेकदा सोशल मीडियावरूनही या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.