नागपूर: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाष्य करण्यात आले आहे. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी म्हटले की, हिंसक आंदोलनं करून कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढता येत नाही. त्यामुळे प्रश्न आणखीनच जटील होतात. त्यामुळे आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आक्रमक पद्धतीने आंदोलन केले. कळंबोलीत आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. तर कोपरखैरणेमध्ये आंदोलकांनी पोलीस चौकी जाळल्याची घटना घडली. या सगळ्या परिस्थितीमुळे नवी मुंबईत प्रचंड तणावाचे वातावरण होते.