आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर-  चंद्रपूरमध्ये एका तरुणीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या तरुणीने अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गायत्री रामटेके असं आहे. ही तरुणी चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. गायत्री ही मूळची भंडाऱ्यातील होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गायत्री चंद्रपूरमध्ये वास्तव्यास होती. आज पहाटेच्या सुमारास गायत्रीने स्वत:च्या राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.


आत्महत्या करण्याआधी गायत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये गायत्रीने एक सेल्फी पोस्ट केला होता. 'हा माझा शेवटचा फोटो आहे. गुड बाय ऑल' अशी कॅप्शन गायत्रीने हा सेल्फी शेअर करताना दिली होती. या तरुणीच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणीच्या रुमची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी रुम सील केली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.



महिला दिनाच्या दिवशीच एका तरुणीने अशाप्रकारे आपलं आयुष्य संपवल्याची बातमी पाहता पाहता शहरभरामध्ये पसरली. या घटनेसंदर्भातील माहिती समजल्यानंतर ही तरुणी राहत असलेल्या परिसरामध्ये काही प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली. पोलीस या प्रकरणामध्ये या तरुणीच्या घरच्यांबरोबरच ती चंद्रपूरमध्ये संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही चौकशी करत आहेत. महिला दिनाच्या दिवशीच तरुणीने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.